अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांच्या समोरच महिलेने घेतले पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:52 IST2019-11-25T17:09:45+5:302019-11-25T17:52:27+5:30
सिडकोच्या जमिनीवर आठ ते दहा कुटुंबाचे अतिक्रमण आहे

अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांच्या समोरच महिलेने घेतले पेटवून
औरंगाबाद : वडगाव शिवारातील सिडको प्रशासनाच्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस विरोध करताना एका महिलेने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २५ ) दुपारी ४ वाजे दरम्यान घडली. दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी सिडकोच्या पथकानेच महिलेस पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.
वडगाव येथे सिडकोच्या मालकीच्या जागेवर ८ ते १० कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. येथे या कुटुंबांनी घरे उभारली आहेत. तसेच ते या जमिनीवर शेतीही कसतात. हे अतिक्रमण काढण्यासाठी सिडकोने आज मोहीम राबवली. दुपारी १ वाजता या भागात सिडकोचे पथक पोलीस बंदोबस्तात या जागेवरील अतिक्रमण काढून रस्ता तयार करत होते. अचानक ४ वाजेच्या दरम्यान येथील भारती जयराम चौहान (४५ ) या महिलेने स्वतः पेटवून घेतले. काही कळायच्या आत आगीच्या लोटात त्या जमिनीवर कोसळल्या. प्रसंगावधान राखत नागरिकांनी त्यांच्यावर पाणी टाकत आग विझवली. मात्र आगीत चौहान यांच्या कंबरेच्यावरील भाग जळाला आहे. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, चौहान यांच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असून सिडकोच्या पथकानेच चौहान यांना पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.