अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:43 IST2025-02-11T16:42:01+5:302025-02-11T16:43:09+5:30

महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठराविक ठिकाणीच, खासगी जागांवरच कारवाई करण्यात येत असल्याचे आरोप पथकावर करण्यात येत आहेत.

Protest against encroachments! MIM workers block Jalna Road | अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम

अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम

छत्रपती संभाजीनगर: जालना रोडवर धूत हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळविक्रेते अनेक दिवसांपासून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नाही. सोमवारी संध्याकाळी ७ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाईचा बडगा उगारला. घटनेची माहिती मिळताच एमआयएम पक्षाचे नेते, कार्यकर्ते दाखल झाले. त्यांनी अतिक्रमण हटाव प्रमुखांवर आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या. फळे रस्त्यावर फेकून दिली. तरुणांनी जालना रोडवर झोपून आंदोलन केले. त्यामुळे अर्धा तास जालना रोडची वाहतूक ठप्प झाली होती.

महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठराविक ठिकाणीच, खासगी जागांवरच कारवाई करण्यात येत असल्याचे आरोप पथकावर करण्यात येत आहेत. त्यातच सोमवारी सायंकाळी अचानक जालना रोडवर धूत हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती एमआयएम नेते नासेर सिद्दीकी यांना देण्यात आली. ते कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारवाईला कडाडून विरोध केला. मनपाचे अधिकारी, कर्मचारी ऐकत नसल्याने फळ विक्रेत्यांनी स्वत:हून हजारो रुपयांचा माल रस्त्यावर फेकून दिला. त्यानंतर आंदोलन करणारे तरुण जालना रोडवर झोपले. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली.

एमआयएमचे गंभीर आरोप
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. ही अतिक्रमणे मनपाला दिसत नाहीत. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. जालना रोड १०० फूट रुंद आहे. तेथे लांब रस्त्याच्या कडेला काही तरुण उदरनिर्वाह करतात. त्यांचे सामान जप्त करणे, दोन हजार रुपये दंड लावणे, वाहनांची नासधूस करणे हे प्रकार सुरू होते. गोर-गरिबांवर अशा पद्धतीने अन्याय केला म्हणून आम्ही विरोध केल्याचे नासेर सिद्दीकी यांनी सांगितले. यापुढेही प्रशासनाने अनावश्यक कारवाई केली तर विरोध केला जाईल.

अधिकारी अनुपलब्ध
अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्याशी या प्रकारावर त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Protest against encroachments! MIM workers block Jalna Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.