आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:29 IST2025-04-24T19:25:51+5:302025-04-24T19:29:40+5:30

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते

Promised first, now the government is running away from promises: Bachhu Kadu | आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर : निवडून येण्यापूर्वी खूप बाता मारल्या; पण आता निवडून आल्यानंतर महायुती सरकार दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढतेय, अशी टीका बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा, माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. पक्षाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित संताजी- धनाजी सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. यावेळी राज्य अभियानप्रमुख महेश बडे, विभागीय निरीक्षक घनश्याम पेठे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे मंचावर उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे अनिल पालोदे, बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे, जालना जिल्हाप्रमुख श्रीमंत राऊत, मोहन मुंडे, अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख विनोद परदेशी, लक्ष्मण पोकळे, मधुकर घाडगे, लक्ष्मी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असे बच्चू कडू यांनी बजावले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते पक्षाचे कार्य सक्रियपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी धनाजी सन्मान पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले, तर शिवाजी गाडे यांनी आभार मानले. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यांतील प्रहारचे कार्यकर्ते व दिव्यांग उपस्थित होते.

Web Title: Promised first, now the government is running away from promises: Bachhu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.