बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती शक्य
By Admin | Updated: December 31, 2014 01:05 IST2014-12-31T00:07:05+5:302014-12-31T01:05:22+5:30
कन्नड : आंबेडकरी बनणे सोपे नाही, पावलोपावली किंमत मोजावी लागते. बाबासाहेबांचे मोठेपण या देशाने समजून घेतले नाही.

बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती शक्य
कन्नड : आंबेडकरी बनणे सोपे नाही, पावलोपावली किंमत मोजावी लागते. बाबासाहेबांचे मोठेपण या देशाने समजून घेतले नाही. त्यांच्याविषयीची द्वेषभावना अजून संपलेली नाही. आपल्या देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे सर्व जग मान्य करीत असताना आपल्या देशातील जनता मात्र समजण्यास तयार नाही. बाबासाहेबांच्या वाङ्मयाचा नवयुवक जसजसा अभ्यास करतील तसतशी विचारांची क्रांती होईल. देश बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती करू शकतो अन्यथा नाही, असा दावा भीमपत्रिकेचे संपादक डॉ. एल. आर. बाली यांनी केला.
मक्रणपूर येथे आयोजित मक्रणपूर परिषद व जयभीम दिन अमृतमहोत्सवी सांगता समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विचारांच्या क्रांतीपीठावर डॉ. अनिल कटारे, बलभीमराज गोरे, चंद्रभान पारखे, भैयाजी खैरकर, डॉ. अरविंद गायकवाड, रतन पंडागळे, उषा भालेराव, डॉ. प्रतिभा अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती.
मक्रणपूर परिषद व जयभीम दिनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभात क्रांती घडविणाऱ्या विचारांची मशाल प्रज्वलित झाली. वेगवेगळ्या वक्त्यांनी मांडलेल्या विचारांनी मुग्ध झालेले श्रोते एकचित्ताने विचार ऐकत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सुरुवातीला मक्रणपूर परिषदेवर आधारित ‘डॉक्युमेंटरी’ दाखविण्यात आली. त्यानंतर गौतम बुद्धांच्या मूर्तीस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर जयभीम फलकाचे अनावरण डॉ. एल.आर. बाली यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला. डॉ. एल. आर. बाली यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
बुद्धप्रिय कबीर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अनिल कटारे, भैयाजी खैरकर यांची आंबेडकरी विचारांची प्रगल्भता सांगणारी भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण मोरे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना युवकांनी इतिहासाचा बोध घेऊन चळवळीस चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले.