संशोधक विद्यार्थिनीकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या प्राध्यापिका निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:11 PM2022-03-31T19:11:32+5:302022-03-31T19:46:44+5:30

विद्यार्थिनीकडे आता २५ हजार आणि व्हायवाच्या वेळेस गाईडला देण्यासाठी २५ हजार रुपये दे, आहे संभाषण असलेली ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे

Professor suspended for demanding Rs 50,000 bribe from research student | संशोधक विद्यार्थिनीकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या प्राध्यापिका निलंबित

संशोधक विद्यार्थिनीकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या प्राध्यापिका निलंबित

googlenewsNext

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखाकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे ५० हजारांची लाच मागण्यात आल्याची एक ऑडीओ क्लिप बुधवारी समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

डॉ. उज्वला भडंगे यांनी शिक्षणशास्त्र विषयामध्ये संशोधन करत असलेल्या विद्यार्थिनीकडे आता २५ हजार आणि व्हायवाच्या वेळेस गाईडला देण्यासाठी २५ हजार रुपये असे ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची ऑडीओ क्लिप बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाली. विद्यार्थिनीने याप्रकरणी कुलगुरू आणि पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर आज दुपारी विद्यापीठातील सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत डॉ. भडंगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. उज्वला भडंगे यांचे विभाग प्रमुख पद काढून घेऊन निलंबित केले आहे. तसेच प्रकरणाची एक समिती चौकशी करेल. समितीने दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू येवले यांनी दिली आहे. 

असे आहे व्हायरल ऑडीओ क्लिपमधील संभाषण 
पहिले संभाषण...

विद्यार्थिनी - मॅडम, वहिनी सांगत होत्या तुमचा फोन आला होता.
प्राध्यापिका - हो, तुम्ही या लवकर.
विद्यार्थिनी - २५ हजार एकदम नाही जमणार, २५ हजार दोघींचे आहेत का?
प्राध्यापिका - नाही, दोघींचे स्वतंत्र,
विद्यार्थिनी - ही फी आहे का? पैसे काढायला भावाला सांगावे लागेल. कशाचे आहेत ते?
प्राध्यापिका - सगळं फोनवर नाही बोलता येणार, व्हाॅटस् ॲप काॅल कर.
.............
दुसरे संभाषण...
प्राध्यापिका - अंजली, सरांचा (गाईड) मला काॅल आला होता. तुम्ही त्यांच्याशी बोललात म्हणे.
विद्यार्थिनी - हो मॅम.
प्राध्यापिका - तुम्ही तिकडे गेलात, मला सांगितले नाही तुम्ही?
विद्यार्थिनी - नाही, मॅम. तुम्ही म्हटले तुम्हाला खूप प्रेशर आले. म्हणून मी त्यांना भेटण्यासंदर्भात बोलले.
प्राध्यापिका - सर मला म्हणाले, तुम्ही विद्यार्थिनींना थेट का म्हटले.
विद्यार्थिनी - मॅम हे चुकीचे आहे. त्यांनी तुम्हाला यात ओढायला नको होते.
प्राध्यापिका - बेटा या लाईनमध्ये असे होते. सर मला म्हणाले, आता बघा मी काय करतो. मी त्यांना म्हटले, असं काही करू नका. तुम्ही माझ्याबद्दलही त्या सरांजवळ चुकीचे बोलल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थिनी - नाही मॅम, काहीच नाही. उगाच ते तुम्हाला म्हणत आहेत. मी फक्त सरांना म्हटले, तुम्हाला बोलायचे आहे. तुम्हाला काॅलेजला भेटायला येते उद्या. एवढेच बोलले.
प्राध्यापिका - सर, मला म्हटले रात्री घरी येतो. तुम्ही त्यांना सांगा, आणून द्या.
विद्यार्थिनी - किती वाजता येतील मॅम सर?
प्राध्यापिका - ते त्यांच्या सोयीने येतात. आठ साडेआठ वाजता येतील. सर विचारत होते, मॅडम हा माझ्या तुमच्यातील विषय आहे. तो विद्यार्थ्यांपर्यंत जात तर नाही ना?
विद्यार्थिनी - सर सर्वच विद्यार्थ्यांसोबत असे करतात का ?
प्राध्यापिका - हो, अरे मी गेले आहे ना त्यांच्याकडे व्हायवा घ्यायला. मला माहिती आहे ना. ते काय करतात. म्हणून मी तुम्हाला पूर्ण सांगितले नाही. कारण ते तुमचे गाईड आहेत. एवढंच म्हटलं, बाई देऊन टाका त्यांना व्हायवाच्या वेळी वाटल्यास मी त्यांना विनंती करेल. तर तू ऐकायला तयार नाही. कालपासून मला अडवून ठेवलंस, झुलवत ठेवलं म्हटलं तरी चालेल.
विद्यार्थिनी - मॅडम आम्हाला तेच चांगले वाटले नाही. तुम्हाला का त्रास आमच्यामुळे. म्हटलं थेट डील करावी.
प्राध्यापिका - पण, सर मला यात समाविष्ट करत आहे. कारण ते दुसऱ्यांवर भरवसा ठेवत नाहीत. मी तुम्हाला सांगत आहे. किंतु परंतु न करता त्यांना तुम्ही पैसे द्या. माझ्यावर तरी विश्वास ठेवा तुम्ही.
विद्यार्थिनी - ते जर सारखेच पैसे मागत राहिले तर...
प्राध्यापिका - असा कसा मागेल सारखा पैसे? मी त्यांचा नरडा नाही पकडणार का? शेवटी व्हायवाच्या वेळी तो तुम्हाला म्हणेल.
विद्यार्थिनी - त्यावेळी आम्हाला किती पैसे द्यावे लागेल?
प्राध्यापिका - हीच रक्कम असेल.
विद्यार्थिनी - २५ हजार रुपये?
प्राध्यापिका - हो, एखाद्या वेळेस मी त्यांना विनंतीही करेल, की घेऊ नका म्हणून पैसे. मी तुझी वाट बारा वाजेपासून बघते आहे. तू बोलल्याचे मला वाईट वाटले.
विद्यार्थिनी - साडेचार वाजता येऊ का?
प्राध्यापिका - पाच वाजता या. तुझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवते. तू मला पाच वाजता इथे पैशांसोबत पाहिजे. माझे पतीचे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्याचा मी कान पकडून त्याला झापू शकते. अन् तू मला एकदम म्हटली की मी काही देऊ शकत नाही.

Web Title: Professor suspended for demanding Rs 50,000 bribe from research student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.