‘मुद्रकांनी संघटित व्हावे’
By Admin | Updated: December 29, 2014 01:07 IST2014-12-29T00:55:29+5:302014-12-29T01:07:01+5:30
औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून, एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करून मुद्रण व्यवसाय वाढविण्याची आणि समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे.

‘मुद्रकांनी संघटित व्हावे’
औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून, एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करून मुद्रण व्यवसाय वाढविण्याची आणि समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुद्रकांनी संघटित व्हावे, असा सूर रविवारी मराठवाडा मुद्रक मेळाव्यात व्यक्त झाला.
औरंगाबाद मुद्रक संघातर्फे मराठवाडा मुद्रक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे कोषाध्यक्ष उदय धोटे, कर सल्लागार सुनील काला यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे मुद्रण क्षेत्रात विविध बदल होत आहेत. आज डिजिटल प्रिंटिंग आणि त्रिमिती तंत्र महत्त्वाचे ठरत आहे. येणाऱ्या काळात त्रिमिती तंत्र आणखी मोठे होणार आहे. तसेच मराठवाड्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) येत आहे.
‘डीएमआयसी’मुळे मराठवाड्याचा, विशेषत: औरंगाबादचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये मुद्रकांनाही मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत.
मेळाव्यात उदय धोटे यांनी अकाऊंटिंग, व्यवस्थापन, कॉस्टिंग आणि सुनील काला यांनी ‘मुद्रण व्यवसाय व कायदे’ याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या मुद्रण स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले. औरंगाबाद मुद्रक संघाचे अध्यक्ष अजितकुमार लोहाडे, उपाध्यक्ष विश्वास पारटकर, सचिव अशोक बुलगे, कोषाध्यक्ष संजय जाधव, ‘इपामा’चे एन.एस. मंकू, जे.एस. कालसी, केशव तुपे, डी.डी. गव्हाड, हरिभाऊ नरवडे, विशाल आर्वीकर, किरण मालोदे, भिकन ओपळकर आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यातील जवळपास २५० मुद्रकांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.