गुन्हा नोंदविण्यासाठी प्रेत दीड तास ठाण्यात
By Admin | Updated: June 22, 2014 00:05 IST2014-06-21T23:26:27+5:302014-06-22T00:05:59+5:30
माजलगाव: पैशाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या एका तरुणाने तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली़

गुन्हा नोंदविण्यासाठी प्रेत दीड तास ठाण्यात
माजलगाव: पैशाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या एका तरुणाने तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली़ त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली़ प्रेत थेट ग्रामीण ठाण्यात आणले़ नातेवाईकांनी प्रेतासह ठाण्यात दीड तास ठिय्या मांडला़ फिर्याद नोंदविल्यावरच नातेवाईकांनी प्रेत उचलले़
गोकुळ आप्पासाहेब शिंदे (वय ३४ रा़ मनूरवाडी ता़ माजलगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे़ माजलगाव शहरातील अशोकनगर भागातील सचिन संभाजी जावळे याच्याकडून योगेश रमेश लऊळकर (रा़ नवीन बसस्थानक, माजलगाव) याने ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते़ शिंदे, लऊळकर व जावळे हे तिघे मित्र आहेत़ लऊळकरचे पादत्राणांचे दुकान असून शिंदे हा वाहनचालक म्हणून काम करायचा़ लऊळकर, जावळे यांच्या पैशाच्या व्यवहारात शिंदे यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली होती़ मुदत संपूनही लऊळकरने जावळे याचे पैसे परत केले नाहीत़ इकडे जावळे याने पैशासाठी शिंदेंकडे तगादा लावला होता़ १६ जून रोजी तर जावळे याने शिंदे यांच्या घरी जाऊन ‘पैसे दे, अन्यथा घरातील सामान उचलून नेईल’ अशी धमकी दिली होती़ तेव्हापासून शिंदे अस्वस्थ होते़ १७ रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले़ त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले़ उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला़
नातेवाईक बसले आडून
संतप्त नातेवाईकांनी पैशाच्या तगाद्याला कंटाळूनच गोकुळ यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करुन प्रेत ग्रामीण ठाण्यात आणले़ सचिन जावळे व योगेश लऊळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या मागणीवरुन नातेवाईक आडून बसले़ त्यानंतर फौजदार छबुराव सोनवणे यांनी नातेवाईकांची समजूत काढली़ शिवाय गुन्हाही नोंदविला़ त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत तेथून हलविले़ मनूरवाडीत सायंकाळी बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले़
(वार्ताहर)