देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडे आठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव; तक्रारदाराविरुध्दच गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 15:08 IST2021-05-28T14:59:18+5:302021-05-28T15:08:14+5:30

हिंगोली गेट भागात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर आपली साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार दिली.

Pretense of snatching eight and a half lakh bags due to debtors; Filed a case against the complainant | देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडे आठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव; तक्रारदाराविरुध्दच गुन्हा दाखल

देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडे आठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव; तक्रारदाराविरुध्दच गुन्हा दाखल

ठळक मुद्देचोरीची खोटी तक्रार आली अंगलट

नांदेड : हिंगोली गेट भागात सकाळी साडे नऊ वाजता चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून आपल्या जवळील साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज सकाळी दिली. मात्र, पोलीस तपासात चोरी झाली नसल्याचे उघड होऊन खोटी तक्रार दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांनी तक्रारदाराविरूद्धच गुन्हा दाखल केला आहे. 

शहरात गेल्या काही दिवसात बॅग पळविण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भर दिवसा चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून बॅग लंपास करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोमेश कॉलनी भागातील गणेश उत्तम पतंगे हा युवक शिवाजीनगर ठाण्यात आला होता. त्याने हिंगोली गेट भागात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर आपली साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार दिली. यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी तातडीने शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. पोनि.अनंत नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, अभिमन्यू सोळंके, संजय ननवरे हे पोलिस निरिक्षकांची फौज रस्त्यावर उतरली होती. 

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही शिवाजीनगर ठाण्यात येवून धडकले. पोनि.द्वारकादास चिखलीकर यांनी पतंगे याची उलटतपासणी केली. त्यात देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे बनाव रचल्याचे उघडकीस आले. तसेच रकमेतील ३ लाख २० हजार रुपये बँकेत भरले, ५० हजार रुपये नारळ पाणी विक्रेत्याला दिले आणि २ लाख ५० हजार घरी असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे खोटी तक्रार दिल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी तक्रारदार पतंगे याच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता पतंगे यांच्याच अंगलट आले आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे.

Web Title: Pretense of snatching eight and a half lakh bags due to debtors; Filed a case against the complainant