औरंगाबाद : गर्भपिशवीला टाका देण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती विवाहितेचा ऑपरेशन थिएटरमध्ये मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी चिकलठाणा येथील एंडोवर्ल्ड रुग्णालयात घडली. या घटनेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूजा सुनील पालोदकर (२७,रा. सांवगी) असे मयत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पूजा या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोमवारी त्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. दुपारी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. यानंतर अवघ्या अर्धा तासाने रुग्णाची तब्येत सिरीयस असल्याचे सांगण्यात आले. तासभराने रुग्ण दगावल्याचे सांगितल्यावर नातेवाइकांना धक्काच बसला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी ते करीत होते. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह रुग्णालयातून हलविण्यास त्यांनी नकार दिला. काही अनुचित घटना घडू नये याकरिता रुग्णालयाबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या घटनेविषयी डॉक्टर पंडित पळसकर म्हणाले की, आमच्या रुग्णालयात अशा नियमित शस्त्रक्रिया होतात. आजही सर्व खबरदारी घेऊन रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र अचानक रुग्ण सिरीयस झाला आणि दगावला.
============
एसीपी भुजबळ यांनी काढली समजूत
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी नातेवाइकांची भेट घेऊन अशा प्रकरणात कायदेशीर कारवाईची पद्धत समजावून सांगितली. यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास रात्री तयार झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे उपस्थित होते.