प्रतीशिवाजींना मोगलांनी डांबले होते धारूरच्या किल्ल्यात!
By Admin | Updated: February 19, 2015 00:45 IST2015-02-19T00:29:52+5:302015-02-19T00:45:36+5:30
प्रताप नलावडे , बीड इतिहासात ज्यांचा उल्लेख प्रतीशिवाजी असा केला जायचा, त्या नेताजी पालकर यांना आठ महिने धारूरच्या किल्ल्यात मोगलांनी स्थानबध्द करून ठेवले होते

प्रतीशिवाजींना मोगलांनी डांबले होते धारूरच्या किल्ल्यात!
प्रताप नलावडे , बीड
इतिहासात ज्यांचा उल्लेख प्रतीशिवाजी असा केला जायचा, त्या नेताजी पालकर यांना आठ महिने धारूरच्या किल्ल्यात मोगलांनी स्थानबध्द करून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध या किल्ल्याशी कधीच आलेला नसला तरी त्यांचे चुलते व वडील धारूरच्या किल्ल्याचे काही काळासाठी सुभेदार असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. हा किल्ला सातवाहनापासून ते अगदी निजामशाहीपर्यंतच्या अनेक घडामोडींची साक्ष आजही देत आहे.
इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. सतीश साळुंके यांनीही शिवाजी महाराजांचा थेट संबंध बीड परिसराशी कधीच आलेला नव्हता, असे सांगतानाच नेताजी पालकर, महाराजांचे वडील शहाजीराजे आणि चुलते मालोजीराजे यांचा मात्र या परिसराशी निकटचा संबंध आला असल्याचे सांगितले.
हिंदवी स्वराज्याचे दीर्घकाळ सरनौबत असणारे आणि अनेक लढायांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. पन्हाळ्याच्या मोहिमेत
वेळेत न पोहोचल्यामुळे मराठी सैन्याची मोठी हानी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराजांनी समयास कैसा पावला नाहीस, असे म्हणत त्यांना बडतर्फ केले. यानंतर पालकर मोगलांना जाऊन मिळाले. मोगलांनी त्यांना धारूरच्या किल्ल्यात वास्तव्यास ठेवले. तब्बल आठ महिने पालकर या किल्ल्यात वास्तव्यास होते. महाराजांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर ‘सिवा सुटला आता प्रतीसिवा सुटता कामा नये’ असे म्हणत औरंगजेबाने पालकरांच्या अटकेचे आदेश काढले तो दिवस होता १९ आॅगस्ट १६६६. त्यावेळी पालकर मोगलांच्या छावणीत होते.
मोगलांनी २४ आॅगस्टला त्यांना धारूरच्या किल्ल्यातच अटक केली. धारूरचा किल्ला हा भूईकोट किल्ला असला तरी भक्कम तटबंदी आणि चोहोबाजंूनी खंदकाचा वेढा असल्याने मुगलांना राज्यातील इतर किल्ल्यापेक्षा हा किल्ला खूपच सुरक्षित असल्याचे वाटत होते. त्यामुळेच पालकरांना अटक केल्यानंतरही काही काळ तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना आग्रा येथे औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वीत छळ करून पुढे त्यांना काबुल-कंदहारच्या मोहिमेवर रवाना केले. पुढे नऊ वर्षे ते या मोहिमेवर होते. दरम्यान काबुल मोहिमेनंतर दिलेरखानसोबत त्यांना मराठी मुलुखात पाठविण्यात आले. पालकर यांना चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप झाल्याने त्यांनी मे १६७६ मध्ये मोगली छावणीतून पलायन करत महाराजांकडे धाव घेतली. त्यांनीही तितक्याच विश्वासाने पालकरांना पुन्हा सैन्यात सामील करून घेतले.
हिंदवी स्वराज्याचे दीर्घकाळ सरनौबत.
४शिवाजी महाराजांचे उजवे हात म्हणून ओळख.
४प्रतापगडावरील अफझलखान वधावेळी त्याची फौज पळवून लावण्याची मोठी कामगिरी.
४अनेक लढाया जिंकल्या. महाराजांसारखेच शौर्य असल्याने प्रतीशिवाजी अशी त्यांची ओळख बनली होती.
धारूर शहर हे अगदी सातवाहन काळापासून एक व्यापारी पेठ म्हणून प्रसिध्द होते. याच काळात शहराच्या सुरक्षिततेच्या विचारातून येथे किल्ला बांधण्यात आला. त्यावेळी त्याला महादुर्ग असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर पुढे आदिलशाही, मुगलशाही आणि निजामशाहीची स्थित्यंतरे या किल्ल्याने पाहिली. मोगलांनी धारूरचे नाव बदलून फतेहाबाद असे केले होते. आदिलशाहीत या किल्ल्याचेच दगड आणि माती वापरून पुन्हा १५६७ मध्ये याच ठिकाणी बांधकाम केले.