पीपीई कीट, मास्कमुळे आरोग्य कर्मचारी देताहेत आजारांना तोंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:27 IST2020-10-28T16:25:36+5:302020-10-28T16:27:36+5:30
पीपीई कीट वापरल्याने अचानक चक्कर, डिहायड्रेशन

पीपीई कीट, मास्कमुळे आरोग्य कर्मचारी देताहेत आजारांना तोंड
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : गेल्या ७ महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी अविरतपणे कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. उपचारातून शेकडो रुग्णांना त्यांनी कोरोनामुक्त केले. मात्र, या लढ्यात रोज किमान ६ तास पीपीई कीट, मास्क वापरावा लागतो. त्यादरम्यान पाणीही पिता येत नाही, लघुशंकेला जाता येत नाही. त्यातून अचानक चक्कर येणे, डिहायड्रेशन, किडनीवर परिणाम अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
औरंगाबादेत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. गेल्या ७ महिन्यांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजारांवर गेली. यातील ३५ हजारांवर रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, मनपा, घाटी, जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचारी २४ तास कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. उपचार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या प्रारंभी पीपीई कीट घालून उपचार करणे ही बाब सर्वांसाठी नवीन होती. शिवाय कोरोनाची सुरुवात ऐन उन्हाळ्यात झाली. त्यामुळे सुरुवातील हे कीट घालून उपचार करताना डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. घामाघूम होत उपचाराची कसरत करावी लागली. ही कसरत अजूनही सुरूच आहे. पीपीई कीट, मास्क घालून ६ ते ८ तास कर्तव्य बजावताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मास्कमुळे श्वसनावर परिणाम होतो. तरीही रुग्णसेवेत कोणताही फरक पडणार नाही, याची काळजी आरोग्य कर्मचारी घेताना दिसतात.
पीपीई कीट वापरल्याने अचानक चक्कर, डिहायड्रेशन
आयसीयूमध्ये किमान ६ तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे एकदा याठिकाणी गेल्यानंतर किमान ६ तास पीपीई कीट, मास्क काढता येत नाही. त्यामुळे पाणीही पिता येत नाही. त्यातूून अचानक चक्कर येणे, डिहायड्रेशनच्या समस्यांना आरोग्य कर्मचारी सामोरे जात आहेत. पीपीई कीट परिधान केल्यानंतर लघुशंकेलाही जाता येत नाही. त्यामुळे याचाही सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी, त्यातूनही शारीरिक आजारांना आमंत्रण मिळण्याचा धोका बळावत आहे.रुग्णसेवा देताना पीपीई कीटमुळे ६ ते ८ तास पाणी पिता येत नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना अचानक चक्कर येण्याचे प्रकार झाल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब तिडके म्हणाले.
कर्तव्यानंतर व्हावे लागते क्वारंटाईन
घाटीतील निवासी डॉक्टरांना १४ दिवस रुग्णसेवा दिल्यानंतर पुढील ७ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. तर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कर्तव्य दिले जात आहे.
कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ
कोरोना रुग्णांवर उपचार देत असल्याने डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांपासून काहीसे दूर राहत आहेत. अनेकांनी तात्पुरत्या स्वरूपात किरायाच्या घरात राहणे पसंत केले आहे. तर काहींनी घरातच वेगळे राहण्याची व्यवस्था केली आहे. अशावेळी मोबाईलवरून संवाद, व्हिडिओ कॉलिंगद्वारे कुटुंबाबरोबर संवाद साधला जातो.
रोटेशननुसार कर्तव्य दिले जाते
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार कर्तव्य दिले जाते. दोन कर्तव्यांत मोठे अंतर असते. रुग्णांचा राऊंड घेताना पीपीई कीट वापरण्यास प्राधान्य दिले जाते. पूर्वीच्या तुलनेतील सध्याचे पीपीई कीट अतिशय चांगले आहे. त्यामुळे त्यांचा काहीही त्रास होत नाही. सतत मास्कचा वापर केल्याने कोणताही परिणाम होत नाही.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक