सेवा सुरु करण्यापूर्वीच महापालिकेकडून शहर बसची जोरदार मार्केटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:43 IST2018-12-17T19:42:35+5:302018-12-17T19:43:13+5:30
२२ डिसेंबरपर्यंत महापालिका शहराच्या विविध भागांत बस नेऊन प्रदर्शन करण्यात येणार आहे.

सेवा सुरु करण्यापूर्वीच महापालिकेकडून शहर बसची जोरदार मार्केटिंग
औरंगाबाद : शहर बस सुरू करण्यापूर्वीच महापालिकेने जोरदार मार्केटिंग सुरू केली आहे. रविवारी मकबरा, तापडिया नाट्यमंदिरासमोर बसचे प्रदर्शन करण्यात आले. शहरातील नागरिकांसह पर्यटकांनीही बसची माहिती घेतली. अनेकांनी बससोबत सेल्फीही काढली. २२ डिसेंबरपर्यंत महापालिका शहराच्या विविध भागांत बस नेऊन प्रदर्शन करण्यात येणार आहे. २३ डिसेंबरला बसच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात येईल.
स्मार्ट सिटी योजनेत महापालिका तब्बल १०० बसेस खरेदी करणार आहे. शहर बस मनपाच्या मालकीच्या असतील. त्या चालविण्यासाठी एस. टी. महामंडळाकडे देण्यात येणार आहेत. महामंडळानेही फक्त ४० बसेस तूर्त चालविण्यासाठी होकार दिला आहे. उर्वरित बसेसबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. फक्त बस खरेदीची महापालिकेला घाई होती. टाटा कंपनीकडून अद्ययावत एक बस तयार करून मनपाला देण्यात आली आहे. मागील आठवड्यात बसचे विधीवत पूजनही करण्यात आले. त्यानंतर बस नागरिकांना पाहण्यासाठी ठिकठिकाणी उभी करण्यात यावी, असा निर्णय दोन दिवसांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला.
रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे मकबरा परिसरात सकाळी १० वाजता स्मार्ट बस उभी करण्यात आली. बस पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. मकबरा पाहून आल्यानंतर पर्यटकांनी बसमध्ये बसण्याचा आनंद घेतला. अनेकांनी सेल्फी काढल्या. पर्यटकांनी बसची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी २ वाजता बस तापडिया नाट्यमंदिरासमोर उभी करण्यात आली. बाजारपेठेत येणारे ग्राहक व नागरिक थांबून बस पाहत होते. पहिल्याच दिवशी बस पाहण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. दररोज ही बस वेगवेगळ्या पर्यटनस्थळांसह शहराच्या मुख्य चौकात उभी केली जाणार आहे.
बसस्थानकांची अवस्था वाईट
महापालिकेने २००७-०८ मध्ये शहर बससेवा सुरू केली होती. तेव्हा शहरात १०० पेक्षा अधिक बसस्थानक तयार करण्यात आले होते. नंतर ही सेवा बंद झाल्यावर बसस्थानकांचा वापरही बंद झाला. सर्व बसस्थानक आज अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. एकीकडे शहर बस सुरू करण्याची घाई मनपा करीत आहे. दुसरीकडे बसस्थानकांची डागडुजीही प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.