ग्रामसेवकांवरील कारवाईचा पोरखेळ!
By Admin | Updated: August 19, 2014 02:12 IST2014-08-19T00:50:38+5:302014-08-19T02:12:48+5:30
बीड : ‘मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कऱ़’ अशी मराठीत एक म्हण आहे़ अपहारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकलेल्या ग्रामसेवकांवरील कारवाईत

ग्रामसेवकांवरील कारवाईचा पोरखेळ!
बीड : ‘मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कऱ़’ अशी मराठीत एक म्हण आहे़ अपहारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकलेल्या ग्रामसेवकांवरील कारवाईत या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय येत आहे़ माजलगाव तालुक्यातील ब्रम्हगाव, केज तालुक्यातील विडा, शिरुर तालुक्यातील वारणी, गोमळवाडा तसेच वडवणी येथील तत्कालीन ग्रामसेवकांना वरिष्ठांनीच अभय दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़
माजलगाव तालुक्यातील ब्रम्हगावचे ग्रामसेवक एस़ बी़ लेंडाळ यांनी दहा महिन्यांपासून ग्रामसभा घेतली नाही़ सरपंच, उपसरपंचांना घरी बोलावून त्यांच्या बोगस ठरावांवर स्वाक्षऱ्या घेतल्या़ नळपट्टी, पाणीपट्टीचा हिशेब नाही, कराची रक्कम हडप केली, असा आरोप ग्रामसेवक लेंडाळ यांच्यावर करण्यात आला़ त्यांच्याविरुद्ध ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केल़े़ त्यानंतर सीईओ राजीव जवळेकर यांनी त्यांच्याविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचे आदेश काढले़ या आदेशाची प्रत उपोषणकर्त्यांना दिली; पण पंचायत विभागाकडून हे आदेश माजलगाव पंचायत समितीला गेलेच नाहीत़ त्यामुळे लेंडाळ आजही ब्रम्हगाव ग्रामपंचायतीतच ठाण मांडून आहेत़
विड्याच्या ग्रामसेवकावर
बीडीओ मेहेरबान!
केज तालुक्यातील विडा येथील ग्रामसेवक आऱ एऩ केदार यांच्यावर दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सामाजिक सभागृह बांधकामात अनियमितता केल्याचा ठपका आहे़ जुन्याच भिंतीवर सभागृहाचे बांधकाम केल्याने तसेच शासन निधी परस्पर उचलून अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे़ कामाची तांत्रिक तपासणी करुन अभियंत्यांनीही अनियमितता असल्याचा अहवाल पंचायत विभागाला पाठविला आहे; परंतु अपहार प्रकरणात गुंतलेल्या केदार यांच्यावर गटविकास अधिकारी गणेश आगरते हे इतके मेहेरेबान झाले की, त्यांनी केदार हे दोषी नाहीत असे प्रमाणपत्र पंचायत विभागाला देऊन टाकले़ सभागृहाचे काम उत्तम व समाधानकारक आहे, निधीचा गैरव्यवहार नाही, अशी सावरासावर करुन केदार यांच्यावर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करु नये, अशी शिफारस १४ आॅगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे केली आहे़ गटविकास अधिकारीच अपहारात दोषी आढळलेल्या ग्रामसेवकांना वाचवित असतील तर कारवाईची अपेक्षा कोणाकडून करायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे़
गटविकास अधिकारी गणेश आगरते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी कट करुन बोलण्यास नकार दिला़ (प्रतिनिधी)