विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या
By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T00:59:52+5:302014-06-27T01:02:37+5:30
औरंगाबाद : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केलेले यश डोंगराएवढे असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी आज आळवला.

विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या
औरंगाबाद : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केलेले यश डोंगराएवढे असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी आज आळवला. गुणवंतांचा आज सिडको नाट्यगृहात सत्कार करून त्यांच्यावर १७ लाख रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट करण्यात आली. हा कौतुक सोहळा असला तरी तेथेही राजकीय शेरेबाजी, शालजोडे आणि चिमटे घेणारी भाषणे झाली.
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळादेखील पालिकेतील रुसव्या- फुगव्यांच्या राजकारणातून सुटला नाही. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे श्रेय घेण्यात प्रशासनाने घेतलेली आघाडी पदाधिकाऱ्यांना खटकल्यामुळे त्याचे पडसाद कौतुक सोहळ्यात उमटले. चिमटे आणि शालजोड्यांच्या भाषणांनी विद्यार्थ्यांसह उपस्थिताना खळाळून हसविले. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याची कल्पना पुढे आणली. त्याला प्रशासनाने परवानगी दिली. जोशींचे हे वक्तव्य ऐकताच व्यासपीठावरील आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना हसू आवरता आवरेना. कारण प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना आजवर कधीच पारितोषिकांचा विषय सांगितलेला नव्हता, तर त्यावर कधी चर्चाही झालेली नव्हती. आयुक्तांनीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिके जाहीर केली होती.
कार्यक्रमाची वेळ १० वाजेची होती. रुसव्या-फुगव्यांच्या सिलसिल्यामुळे १२ वा. कार्यक्रम सुरू झाला. महापौर कला ओझा यांना निमंत्रण देण्यासाठी दोन अधिकारी गेले होते. त्यांना कार्यक्रमाची माहिती नव्हती म्हणून त्या वेळेत येऊ शकल्या नाहीत, असे नंतर समजले.तर विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून देण्यात आलेल्या रकमेचा ठराव सभेसमोर झालेला नाही. शिवाय आजच्या कार्यक्रमाची आर्थिक रूपरेषादेखील समोर आली नसल्याचे अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे उपस्थित केले.
प्रोटोकॉलप्रमाणे महापौर अध्यक्षीय भाषण करतात. मात्र, त्यातही काही गडबड झाली होती. उपमहापौर संजय जोशी यांच्या लक्षात ती बाब आल्यानंतर भाषणाची यादी बदलण्यात आली. त्याचे पडसाद कार्यक्रमात उमटले.
भाषण संपताच महापौरांनी सिडको नाट्यगृह सोडले.
महापौरांची प्रतिक्रिया...
महापौर ओझा म्हणाल्या, कार्यक्रमाला जायचे होते म्हणून कार्यक्रमातून बाहेर पडले. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांचे कौतुक करणे पालिकेचे कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी काहीही नाराजी नव्हती; परंतु पारितोषिकांचा मुद्दा धोरणात्मक होता. त्याची माहिती सर्वांना असणे गरजेचे होते. मनपा शाळांची अवस्था वाईट आहे. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही केल्याचे त्यांनी सांगितले.