पोलिसांची ‘बी समरी ’ न्यायालयाने फेटाळली
By Admin | Updated: July 7, 2015 00:40 IST2015-07-07T00:33:30+5:302015-07-07T00:40:55+5:30
औरंगाबाद : पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करून गेवराई (ता. जि. औरंगाबाद) येथील जमीन फेरफार प्रकरणाचा तपास करावा व अहवाल न्यायालयात सादर करावा,

पोलिसांची ‘बी समरी ’ न्यायालयाने फेटाळली
औरंगाबाद : पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करून गेवराई (ता. जि. औरंगाबाद) येथील जमीन फेरफार प्रकरणाचा तपास करावा व अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. तसेच या प्रकरणात पोलिसांचा ‘बी समरी’ अहवालही न्यायालयाने फेटाळला.
फिर्यादी रफिक अहमद मोहम्मद उस्मान (रा. लेबर कॉलनी) यांच्या वडिलोपार्जित जमीन गट क्र. ११ मौजे गेवराई यांच्या जमिनीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना तहसीलदार, लिपिक, तलाठी यांनी मिळून जमिनीचा फेरफार केला. त्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सिटीचौक पोलिसांनी जमादार जगताप यांना याप्रकरणी नेमले. त्यांनी न्यायालयात बी समरी अहवाल दाखल केला.
त्याला फिर्यादीने आक्षेप अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने ही बी समरी अहवाल फेटाळत सहायक आयुक्तांना आदेश देऊन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास करण्यास सांगितले होते. पोलीस निरीक्षकांनीही या प्रकरणी बी समरी दाखल केली. त्यावरही फिर्यादीने आक्षेप घेतला. न्यायालयात सुनावणी होऊन हा अहवालदेखील फेटाळण्यात आला. न्यायाधीशांनी आता थेट पोलीस आयुक्तांना नोटीस काढण्याचे आदेश बजावले आहेत. अॅड. ए. आर. अंबरी, अॅड. राहुल जोशी यांनी फिर्यादीची बाजू मांडली.