कुख्यात टिप्याच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:53 IST2021-02-06T13:51:59+5:302021-02-06T13:53:31+5:30
विजयनगर येथील आरोपी शेख जुबेर उर्फ गुड्डु हा घरात झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कुख्यात टिप्याच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्याच्या नावाखाली त्याचा भाऊ विजयनगरात चालवित असलेला जुगार अड्डा पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकून उदध्वस्त केला. याप्रकरणी टिप्याच्या भावासह ११ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४८ हजार ५०० रुपये रोख, ८ मोबाईल आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
टिप्याचा भाऊ अड्डाचालक शेख जुबेर उर्फ गुड्डू शेख मकसूद, युनुस बेग मिर्झा, सतीश भानुदास होले,प्रभाकर किसन रणदिवे,इमरान बिन अब्दुल राउफ,विजय कैलाश खरे, अन्वर कुरेशी फिरोज कुरेशी, शेख खालीद शेख इलियास, राम सुदाम सोनवणे, अक्षय देविदास लकडे,शंकर प्रल्हाद खंदारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विजयनगर येथील आरोपी शेख जुबेर उर्फ गुड्डु हा घरात झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके,कर्मचारी फरताळे, रमेश सांगळे आणि कर्मचाऱ्यांनी रात्री साडेदहा वाजता तेथे धाड टाकली असता आरोपी पैशावर पत्ते खेळत असल्याचे दिसून आले. त्यांना अटक करण्यात आली. याविषयी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोउपनि आढाव तपास करीत आहेत.