पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ, पोलिस पाटील ‘नवरोबा’ला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:00 IST2025-06-05T11:59:31+5:302025-06-05T12:00:04+5:30

कौटुंबिक न्यायालय : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ (३) चा भंग

Police Patil 'Navroba' jailed for intentionally avoiding paying alimony | पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ, पोलिस पाटील ‘नवरोबा’ला कारावास

पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ, पोलिस पाटील ‘नवरोबा’ला कारावास

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला एक वर्षाची पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करणारा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावचा पोलिस पाटील गणेश सीताराम राऊत याला औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश स्मिता पी. सावसकर यांनी ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गणेश राऊत याने ६ महिन्यांचा कारावास पूर्ण केल्यास अथवा पोटगीची थकीत रक्कम एक लाख ८० हजार रुपये जमा केल्यास (यापैकी जे आधी पूर्ण होईल) त्याची सुटका करावी, असे आदेशात म्हटले आहे. अर्जदार सायली यांनी ‘वसुली अर्जात’ म्हटल्यानुसार गणेश राऊत याने पत्नीला १० हजार रुपये आणि ३ वर्षांच्या बालकाला पोटगी म्हणून दरमहा देण्याचा आदेश न्यायालयाने २० मार्च २०२४ रोजी दिला होता. मात्र, अनेक प्रयत्न करूनही पती पोटगी देत नव्हता. म्हणून पतीविरुद्ध ‘अटक वॉरन्ट’ जारी करण्याची विनंती पत्नीने अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड येथील पोलिसांनी गणेशला येथील कौटुंबिक न्यायालयात हजर केले होते.

पोटगी देण्यास चक्क नकार
एकूण थकीत ७ लाख ३० हजारांपैकी किती रक्कम भरण्यास तयार असल्याचे न्यायालयाने गणेशला विचारले असता त्याने केवळ ५ हजार रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली. त्याच्या अशा वर्तनामुळे न्यायालयाने गणेशने हेतुपुरस्सर पोटगी थकवून न्यायालयाच्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १२५(३) नुसारच्या आदेशाचा भंग केल्याचे निरीक्षण नोंदवीत वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title: Police Patil 'Navroba' jailed for intentionally avoiding paying alimony