पोलिस चौकीचे कुलूप उद्घाटनापासून निघेना!
By Admin | Updated: June 28, 2014 01:15 IST2014-06-28T00:36:45+5:302014-06-28T01:15:59+5:30
शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़
पोलिस चौकीचे कुलूप उद्घाटनापासून निघेना!
शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़
शिरूर अनंतपाळच्या मुख्य रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळाल्याने आणि अतिक्रमण हटावची मोहिम धडकपणे राबविण्यात आल्याने येथील उदगीर रस्त्यावर मोठा चौक सहा महिन्यापूर्वी निर्माण झाला़ या मोकळया चौकाला नाव देण्यासाठी अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्या़ परंतु, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी चौकाऐवजी पोलिस चौकी निर्माण केल्यास अधिक फायदेशीर ठरेल, अशी कल्पना सुचविली़
पोलिस चौकीमुळे वाहतुकीचे नियंत्रण होईल़ रहदारी सुरळीत होईल, त्याचबरोबर गावात नेहमी शांतता रहावी म्हणून पोलिसांना बसण्यास निश्चित ठिकाण होईल, अशी या कल्पनेमागील भावना होती़
त्यानुसार लोकसहभागातून हजारो रूपये निधी गोळा करून पोलिस चौकी सहा महिन्यापूर्वी उभारण्यात आली़ विशेष म्हणजे चौकीत बसण्यासाठी टेबल, खुर्चीची व्यवस्थाही करण्यात आली़ या पोलिस चौकीचे रितसर पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकीदार नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणाही केली़ उद्घाटनानंतर मात्र ही घोषणा हवेतच विरली़ सहा महिन्यापासून पोलिस ठाण्याकडून चौकीदार नियुक्त करण्यात आला नसल्याने पोलिस चौकी कुलूपबंद आहे़ (वार्ताहर)
चौकीदार देण्यात येईल़़़
शिरूर अनंतपाळ येथे उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीसाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक बंडोपंत मुंडे यांनी सांगितले़
या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी चोख भूमीका बजावली होती़ परंतु, आता ही चौकीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे़ पोलिसही उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहत आहेत़ चौकीदार नसल्याने गावात पुन्हा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सध्या मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्याने एकीरी वाहतूक सुरु आहे़ त्यामुळे पोलिस चौकी सुरु करावी, अशी मागणी होत आहे़