माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना वर्षाचा कारावास; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:26 IST2025-08-07T17:22:31+5:302025-08-07T17:26:06+5:30
सत्र न्यायालयाने २० हजारांचा दंडही ठोठावला

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना वर्षाचा कारावास; काय आहे प्रकरण?
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यामधील पोलिस निरीक्षकाला थप्पड मारल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांना बुधवारी नागपूर सत्र न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच एकूण २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायाधीश आर. जे. राय यांनी हा निर्णय दिला.
ही घटना १७ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर शहरातील वर्धा रोडवरील हॉटेल प्राइड येथे घडली होती. त्या दिवशी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती. आवश्यक नेत्यांनाच बैठकीच्या कक्षात प्रवेश दिला जात होता. हर्षवर्धन जाधव यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे ते जोरजोरात ओरडून ‘माझी आत येण्याची औकात नाही का’ असे म्हणाले. परिणामी, सुरक्षा ताफ्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सतर्क होऊन परिस्थिती सांभाळायला लागले. दरम्यान, हर्षवर्धन जाधव चिडले. त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पोलिस निरीक्षक पराग जाधव यांच्या डाव्या गालावर थापड मारली आणि तेथून धावपळ करीत निघून गेले. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी पराग जाधव यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदविला. सरकारच्या वतीने ॲड. चारुशीला पौनिकर यांनी बाजू मांडली.
अशी आहे पूर्ण शिक्षा
१ - भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे) अंतर्गत एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.
२- भादंवि कलम ३३२ (सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे) अंतर्गत एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.