परीक्षा संचालकांची उपकुलसचिवांविरोधात संचिका चोरल्याची पोलिसांतील तक्रार ३ दिवसांनी माघारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:46 IST2025-08-05T19:45:21+5:302025-08-05T19:46:05+5:30
गैरसमजातून प्रकार घडल्याची कबुली; महिला उपकुलसचिवांच्या झालेल्या बदनामीची जबाबदारी कोणाची?

परीक्षा संचालकांची उपकुलसचिवांविरोधात संचिका चोरल्याची पोलिसांतील तक्रार ३ दिवसांनी माघारी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या संचालकांनी २४ जून रोजी एका महिला उपकुलसचिवाने परीक्षा विभागातील संचिका चोरून नेल्याचा आरोप केला होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात २७ जून रोजी तक्रार नोंदवली. त्यानंतर ३ दिवसांनी संबंधित संचिका कार्यालयातच असल्याचे सांगत घडलेला प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे ३० जून रोजी बेगमपुरा पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. या प्रकरणातील ही कागदपत्रे माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहेत.
विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी उपकुलसचिव हेमलता ठाकरेंवर आरोप केला होता. ठाकरेंनी २४ जून रोजी वरिष्ठांची परवानगी न घेताच गोपनीय संचिका गाडीतून घरी नेल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यात बीए युनिट, एमए युनिटसह परीक्षेच्या संदर्भातील गोपनीय संचिका आणि गोल शिक्का, संचालकांचा शिक्का नेल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात चोरीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणीही त्यांनी केली. या तक्रारीच्या चौकशीत उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी पोलिस ठाण्यासह परीक्षा संचालकांना खुलासा करीत कोणत्याही प्रकारच्या संचिका माझ्याकडे नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर पोलिसांनी पुन्हा परीक्षा संचालक डॉ. डोळे यांना चाैकशीसाठी बोलावले. तेव्हा डॉ. डोळे यांनी संबंधित संचिकांविषयी कार्यालयात चाैकशी केल्यानंतर त्या मिळाल्याचे नमूद करीत, उपकुलसचिव ठाकरे यांनी व्हिडीओमध्ये फाइलींचे गठ्ठे बांधून घेऊन जात असल्याचे दिसल्याने गैरसमजातून तक्रार नोंदविल्याचे जबाबात म्हटले आहे. याविषयीचा पत्रव्यवहार नुकताच माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला आहे.
झालेल्या बदनामीची जबाबदारी कोणाची?
विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने कोणतीही शहानिशा न करताच थेट उपकुलसचिवांवर संचिका चोरून नेल्याचा आरोप केला. तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर स्वत:च जबाब नोंदवीत संचिका कार्यालयातच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात महिला उपकुलसचिवांच्या झालेल्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.