पोलिसांनी पुण्यातून प्रेमी युगुलास परत आणले; सहाव्या दिवशी युवकाने आयुष्य संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:10 IST2020-07-20T19:08:53+5:302020-07-20T19:10:45+5:30
पोलीस ठाण्यात दोघांनीही आपापल्या घरी जाण्याचे स्वेच्छेने सांगितले होते.

पोलिसांनी पुण्यातून प्रेमी युगुलास परत आणले; सहाव्या दिवशी युवकाने आयुष्य संपवले
पैठण : शहरातील २० वर्षीय युवकाने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहा दिवसांपूर्वीच पोलिसांनी प्रेयसीसह या युवकास चाकण (जि. पुणे) येथून परत आणले होते. दरम्यान, युवकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीच्या आईसह चार जणांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजय राजू दाभाडे (२०, रा. नवीन कावसान) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. २३ जून रोजी शहरातील प्रेयसीसह कुणाला काहीएक न सांगता हा युवक पैठण येथून निघून गेला होता. मुलीच्या घरच्यांनी याबाबत मिसिंग अर्ज पैठण पोलीस ठाण्यात दिला होता. पोलिसांनी शोध घेऊन अजय दाभाडे व त्याच्या प्रेयसीला १३ जुलै रोजी चाकण येथून परत आणले होते. पोलीस ठाण्यात दोघांनीही आपापल्या घरी जाण्याचे स्वेच्छेने सांगितले होते.
दरम्यान, प्रेयसीच्या घरच्यांंनी अजय दाभाडे व परिवारातील सदस्यांना धमकावणे, घरासमोर येऊन दहशत निर्माण करणे, असे प्रकार केल्याने अजय मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली, अशी फिर्याद रविवारी सायंकाळी अजयच्या वडिलांनी पैठण ठाण्यात दिली. यावरून प्रेयसीचे नातेवाईक असलेल्या दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.