बंदुकीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:12 IST2021-05-13T17:10:21+5:302021-05-13T17:12:58+5:30
गौतम बाबासाहेब बनकर (रा. मिसारावाडी) आणि शस्त्र परवानाधारक राजू शंकर खरात अशी आरोपींची नावे आहेत.

बंदुकीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद : दहशत निर्माण करण्यासाठी शेजाऱ्याची बंदूक हातात घेऊन घरातून बाहेर येत असल्याची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित करणे दोन जणांना चांगलेच महागात पडले. गुन्हे शाखेने बंदुकीचा परवाना असलेल्या माजी सैनिकासह त्या तरुणावर गुरुवारी कारवाई केली.
गौतम बाबासाहेब बनकर (रा. मिसारावाडी) आणि शस्त्र परवानाधारक राजू शंकर खरात अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी खरात हे माजी सैनिक असून, ते जुना मोंढ्यातील अजिंठा बॅंकेचे सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्याकडे परवाना असलेली बारा बोअरची बंदूक आहे. दोघेही शेजारी राहतात. बनकर हा खरात यांच्या मुलाचा मित्र असल्यामुळे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे असते. फेब्रुवारीत खरात यांनी बंदूक साफसफाई करण्यासाठी घरी नेऊन ठेवली होती. तेव्हा त्यांची नजर चुकवून बनकरने ही बंदूक घेतली आणि मोबाइलवर एक व्हिडिओ क्लिप बनविली. त्यात तो सिनेस्टाईल एका घरातून बाहेर येतो आणि बंदूक दाखवून एका ओट्यावर बसतो. ही व्हिडिओ क्लिप त्याने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर व्हायरल केली.
याविषयी गुन्हे शाखेला माहिती मिळताच साहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, शेख हबीब, विजय निकम, शिवलिंग होणराव, गोविंद पचरंडे आणि गायकवाड यांनी आज दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शस्त्र परवान्याचे उल्लंघन करणे आणि कोणतेही प्रशिक्षण नसताना बंदूक हाताळल्याचा गुन्हा पोलिसांनी सिडको ठाण्यात नोंदविला आहे.