पीएमडीचा मुख्य सूत्रधार अटकेत
By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-05T23:53:34+5:302014-07-06T00:12:55+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी दुप्पट, तिप्पट आणि पाचपट रक्कमेचे आमिष दाखवून हजारो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पीएमडी कंपनीचा मालक मुंजाजी डुकरे आणि त्याचा सहकारी कृष्णा आबूज या दोन आरोपींना

पीएमडीचा मुख्य सूत्रधार अटकेत
विठ्ठल भिसे, पाथरी
दुप्पट, तिप्पट आणि पाचपट रक्कमेचे आमिष दाखवून हजारो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पीएमडी कंपनीचा मालक मुंजाजी डुकरे आणि त्याचा सहकारी कृष्णा आबूज या दोन आरोपींना पोलिसांनी ५ जुलै रोजी अटक केली़ आरोपी अटक झाल्यानंतर पोलिस ठाण्यात पैसे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची रीघ लागली होती़
पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील मुंजाजी डुकरे या दहावी नापास तरुणाने एक वर्षापूर्वी पीएमडी मल्टी सर्व्हिस नावाची कंपनी स्थापन करून परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर या कंपनीचे जाळ पसरविले़ अल्पावधीत दाम दुप्पट, तिप्पट आणि पाचपट रक्कमेचे आमिष दाखवत गुंंतवणूकदाराला या कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडले़ सुरुवातीला सहा महिन्यांच्या कालावधीत छोट्या छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या दोनपट रक्कम परत करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला़ एजंटच्या मार्फत गुंतवणूकदार या कंपनीत पैसे गुंतवत गेले़ या कंपनीच्या संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये मिळालेल्या माहितीनुसार १३ मार्च २०१३ ते १४ मे २०१४ या १४ महिन्याच्या कालावधीत या कंपनीच्या खात्यावर ३ हजार ५०० ग्राहकांचे २५ कोटी ३९ लाख ८ हजार २३ रुपये उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ सुरुवातीला आॅनलाईन बँकींगच्या व्यवहारातून अनेक ग्राहकांनी या कंपनीच्या खात्यात पैसे जमा केले़ मागील सहा महिन्यांपासून या कंपनीकडे पैसे जमा करणाऱ्यांचा लोंढा वाढत गेला़ कंपनीने ग्राहकांना पैसे परत न देता पुढील तारखेचे धनादेश देऊन ग्राहकांना झुलवत ठेवले़ बँक व्यवहार बंद झाल्यानंतर या कंपनीने पावतीद्वारे अनेक ग्राहकांसोबत व्यवहार केले़ जमा झालेल्या पैशातून तालुका आणि जिल्हाभरात विविध ठिकाणी करोडे रुपयांची मालमत्ता, मोटार गाड्या खरेदी केल्या़ शेवटी ग्राहकांचा तगादा लागल्याने पीएमडीचा मुख्य सूत्रधार मुंजाजी डुकरे आणि कृष्णा मुरलीधर आबूज या दोघांनी पाथरी येथून कंपनीत जमा झालेल्या पैशांसह पलायन केले़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला खरा़ परंतु, कंपनीच्या दोन संचालकांना अटक झाली आणि हे दोघेही जमातीवर सुटले गेले़ ५ जुलै रोजी मुंजाजी डुकरे आणि कृष्णा आबूज हे दोन आरोपी दुपारच्या सुमारास अलीशान गाडीमध्ये पोलिस ठाण्यात येऊन हजर झाले़ त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली़ (वार्ताहर)
दहावी नापास तरुणाचा प्रताप
कुक्कटपालनाचा व्यवसाय करणारा पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील पीएमडी कंपनीचा मुख्य सूत्रधार मुंजाजी डुकरे हा दहावी नापास आहे़ रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न घेऊन मुंजाजी डुकरे याने पीएमडी नावाची कंपनी स्थापन करून हजारो उच्चशिक्षित ग्राहकांना फसविले़ पोलिस ठाण्यामध्ये या आरोपीस पाहण्यासाठी गुंतवणूकदार ग्राहकांची दिवसभर रीघ लागली होती़ कंपनीमध्ये पैसे जमा करणाऱ्या एजंटलाही आता या प्रकरणात आरोपी करण्याची पोलिसांकडून तयारी चालू आहे़