बनावट कागदपत्रांच्या आधारे केली प्लॉटची रजिस्ट्री; सिल्लोड कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 21:42 IST2019-01-20T21:41:38+5:302019-01-20T21:42:28+5:30
सिल्लोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा (रजिस्ट्री) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे सिल्लोड येथील सुभाष पुंडलिक पारवे यांचा प्लॉट तिस-यानेच मीच पारवे असल्याचे भासवून दुस-याला विक्री केला.

बनावट कागदपत्रांच्या आधारे केली प्लॉटची रजिस्ट्री; सिल्लोड कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
सिल्लोड : सिल्लोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा (रजिस्ट्री) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे सिल्लोड येथील सुभाष पुंडलिक पारवे यांचा प्लॉट तिस-यानेच मीच पारवे असल्याचे भासवून दुस-याला विक्री केला. यात विक्री करणारे व साक्षीदार या सर्वांचे ओळखपत्र बनावट तयार करण्यात आले आणि चक्क सहायक दुय्यम निबंधकांनी डोळ्यावर पट्टी बांधून ही रजिस्ट्री पण केली. सातबा-यावरून नाव कमी झाल्यानंतर आपला प्लॉट विकल्याचे पारवे यांना तब्बल दोन वर्षांनंतर कळाले अन् त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
सिल्लोड रजिस्ट्री कार्यालयात भोंगळ कारभार सुरू आहे. पैसे द्या आणि कुणाचीही जमीन तुमच्या नावावर करून घ्या, असा प्रकार येथे सुरू आहे. यामुळे तालुक्यातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जमीन खरेदी करणाया सलीम अहेमद पठाण (रा. मोढा बु.) याला अटक केली आहे. तर इतर तीन अशा चार जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. यातील मुख्य ३ आरोपी फरार आहेत.
सुभाष पुंडलिक पारवे (रा. शिवाजीनगर, सिल्लोड) यांच्या मालकीचे शहरातील गट क्रमांक १८/३ मध्ये १७५ व १७६ गट क्रमांकामध्ये १५७६ चौरस फूट प्लॉट होते. त्यांना काहीच माहीत नसताना तीन अज्ञात जणांनी प्लॉटचा मालक सुभाष पारवे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले. त्याचप्रमाणे दोन साक्षीदारांचेही बनावट आधार कार्ड तयार केले आणि या तिन्ही आरोपींनी मोढा बु. येथील सलीमखा अहेमदखा पठाण यांना सदर प्लॉट २०१६ मध्ये चक्क रजिस्ट्री करून दिला.
याबाबत पारवे यांना याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. काही कामानिमित्त त्यांनी सातबारा काढला असता त्यांना आपला प्लॉट गायब झाल्याचे दिसले. त्यांनी सिल्लोड येथील रजिस्ट्री कार्यालयात चौकशी केली असता त्यांना घडला प्रकार कळला. त्यांनी लगेच सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हा प्लॉट खरेदी करणाºया सलीमखा अहेमदखा पठाण याला अटक केली. केवळ प्लॉट खरेदी करून घेणा-या व्यक्तीचे आधार कार्ड खरे असल्याने तो पोलिसांना सापडला.
आधार कार्डावरील नावे बनावट
यात खरेदी करून देणा-या आरोपीने आपले फोटो वापरून सुभाष पुंडलिक पारवे नावाने आधार कार्ड बनविले. तर साक्षीदार असलेल्या ओळखपत्रावर दादाराव रामचंद्र काळे (रा. सिल्लोड), विकास माणिकराव पारवे (रा. सिल्लोड) ही बनावट नावे टाकली. फोटोमधील व्यक्ती बनावट नाहीत, मात्र बनावट नावे वापरली गेली.
सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद
सदर रजिस्ट्री करून देणारे व घेणारे सर्व ४ आरोपी सिल्लोड दुय्यम निबंधक कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र बोगस नाव असल्याने आरोपी सापडत नसल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक तांबे यांनी सांगितले.
असे फुटले बींग
सुभाष पारवे यांच्या प्लॉटच्या लगत असलेल्या एका प्लॉटधारकाने त्यांच्या प्लॉटची चर्तुसीमा तयार केली असता, पारवे यांच्या प्लॉटच्या जागी सलीमखा पठाण यांचा प्लॉट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने हा प्रकार पारवे यांच्या कानावर घालून प्लॉट विक्री करावयाचा होता तर आम्हाला सांगितले असते. आम्ही प्लॉट विकत घेतला असता., असे सांगितल्यानंतर पारवे यांनी मी प्लॉट विक्री केलाच नसल्याचे सांगितल्याने प्लॉटची बनावट खरेदी झाल्याचे बिंग फुटले.
रजिस्ट्री कार्यालयात चालतो गोरख धंदा..
याबाबत लोकमतने १९ जानेवारी रोजी ग्रीनझोनच्या नावाखाली अडवणूक, चिरीमिरी दिल्यावर होतो खरेदी -विक्रीचा व्यवहार या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. आता तर पैशासाठी चक्क दुसºयाचे प्लॉट तिसºयाने बनावट ओळखपत्राआधारे विक्री केल्याचे समोर आले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून तर ही रजिस्ट्री झाली नसेल. यात वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यास यात अनेक दलाल, काही अधिकारीदेखील सहभागी असल्याचे समजेल. पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा अशी मागणी होत आहे.