पेरलं, पण उगवलंच नाही
By Admin | Updated: July 19, 2014 00:41 IST2014-07-18T23:43:27+5:302014-07-19T00:41:07+5:30
बीड : पावसाळा सुरु होऊन तब्बल महिनाभर ओढ दिल्यानंतर पडलेल्या पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांची पेरणी केली़

पेरलं, पण उगवलंच नाही
बीड : पावसाळा सुरु होऊन तब्बल महिनाभर ओढ दिल्यानंतर पडलेल्या पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांची पेरणी केली़ पेरणीनंतर मात्र पाऊसच न झाल्याने अनेक भागातील बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे़ मशागतीसह बियाणावर झालेला मोठा खर्च वाया गेल्याने आता पुन्हा बियाणासाठी कोठून पैसे आणावेत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे़
अंबाजोगाई तालुक्यात सोयाबीन उगवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात मंदावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ पेरलेले बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रार अर्ज तालुका कृषि कार्यालयात आले आहेत. अडीच हजार रुपयांत ३० किलो बियाणांची महागामोलाची बॅग विकत घेऊन पेरल्या तर अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरले. अंबाजोगाई तालुक्यात बहुतांश गावांमध्ये असा प्रकार झाल्याचे निदर्शनास येऊ लागल्याची प्रतिक्रिया तालुका कृषि अधिकारी डी. व्ही. बिराजदार यांनी लोकमतशी बोलतांना दिली. पेरणीनंतर मोठा पाऊस झाल्याने उगवण क्षमता मंदावल्याचे बिराजदार म्हणाले. तसेच अनेक ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे पेरणी झाल्यामुळे बियाणे खोलवर रुजले याचाही विपरित परिणाम उगवण क्षमतेवर होऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले. बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषि कार्यालयात दाखल झाल्या आहेत. या प्रकाराची माहिती आपण जिल्हा कृषी अधीक्षकांकडे कळवली असल्याचे ते म्हणाले.
माजलगाव तालुक्यात ३५ टक्के पेरणी झाली आहे़ यात १८ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ सोयाबीन, बाजरी, मका यांचे क्षेत्र मोठे आहे़ तालुक्यात एकाच पावसावर मोठ्या पेरण्या झाल्या़ मात्र यानंतर पाऊस न आल्याने शेतकरी आता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत़ पाऊस नसल्याने सोयाबीन उत्पादनावर परिणाम होईल, अशी शंका तालुका कृषी अधिकारी सी़ आऱ देशमाने यांनी व्यक्त केली़
धारुर तालुक्यातही फारसे समाधानकारक चित्र नाही़ २७ हजार हेक्टरवर पेरण्या झाले असून त्यापैकी १५ हजार हेक्टरवर खरीपाची पेर रखडली आहे़ मोहखेड, तेलगाव आदी परिसरात चित्र भयावह आहे़ अनेक ठिकाणी बी पेरले मात्र उगवलेच नसल्याने शेतकरी हताश झाला आहे़
बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, वडवणी या तालुक्यातही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे ढग आहेत़ आगामी तीन ते चार दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती आणखीच बिघडेल अशी चिंता शेतकऱ्यांना आहे़ (प्रतिनिधी)
दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट
वातावरणातील आर्द्रता व पावसाच्या पाण्यामुळे सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता कमी झाली. अनेक शेतकऱ्यांनी घरचे बियाणे बीज-प्रक्रिया न करता पेरल्याने हा धोका निर्माण झाल्याचे मराठवाडा कृषि विद्यापिठाचे सेवानिवृत्त कुलसचिव डॉ. डी. ए. चव्हाण म्हणाले़
सोयाबीनचे बियाणे न उगवल्यास त्याचा पंचनामा करावा़ तसेच अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.