प्लॅन करून उधळली सभा!
By Admin | Updated: December 21, 2014 00:17 IST2014-12-21T00:06:35+5:302014-12-21T00:17:58+5:30
औरंगाबाद : महापालिकेची २० डिसेंबरची सभा आर्थिक उलाढालींच्या प्रस्तावांमुळे नियोजन (प्लॅन) करून उधळण्यात आली.

प्लॅन करून उधळली सभा!
औरंगाबाद : महापालिकेची २० डिसेंबरची सभा आर्थिक उलाढालींच्या प्रस्तावांमुळे नियोजन (प्लॅन) करून उधळण्यात आली. बहुतांश नगरसेवकांच्या वॉर्डात विकासकामे सुरू आहेत. मात्र, विकासकामे होत नसल्याची ओरड करीत काही नगरसेवकांनी सभेत धुडगूस घालून विषयपत्रिका सुरू करण्याची वेळच येऊ दिली नाही.
‘लोकमत’ने महापालिकेतील काही नगरसेवकांचा उद्याने, पार्किंगसाठी असलेल्या जागांवरील आरक्षण उठविण्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यासंबंधीच्या ठरावाचे इतिवृत्त आज फेटाळले जाणार होते. मात्र जाणीवपूर्वक गोंधळ करून सभा तहकूब करण्यात आली.
कुभांड रचून वेळ खर्ची घालण्याचा प्रकार पालिकेत नवीन नाही. परंतु आता मनपा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणखी दोन ते तीन सभा होतील. त्यामुळे आजच्या सभेला विशेष असे महत्त्व असतानाही ती उधळून लावून नगरसेवकांनी अनेक विषयांची व्याप्ती संपुष्टात आणली. शहरात पथदिवे बंद आहेत, रस्ते उखडलेले आहेत. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टी वसुलीसाठी नेमलेले एजंट गुंडगिरी करीत आहेत. पाणीपट्टी वसुलीला काही महिने स्थगिती देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात येणार होती. या सगळ्या विषयांना बगल देऊन एक-दोन नगरसेवकांनी सभेला वेगळे वळण लावले. २२ डिसेंबर रोजी तहकूब केलेली सभा घेण्यात येणार आहे.