नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकास

By Admin | Updated: August 29, 2014 01:32 IST2014-08-29T01:20:12+5:302014-08-29T01:32:34+5:30

औरंगाबाद : नगर परिषदेच्या स्थापनेमुळे सातारा आणि देवळाई परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना,

Planned development due to Municipal Council | नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकास

नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकास

नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकास
औरंगाबाद : नगर परिषदेच्या स्थापनेमुळे सातारा आणि देवळाई परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज यासारख्या पायाभूत सुविधांसाठी नगर परिषदेला भरघोस अनुदान मिळू शकणार आहे. तसेच नगर परिषदेला पुरेसा कर्मचारी वर्गही मिळणार आहे.
ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी सरकारकडून अत्यल्प निधी मिळत असतो. मात्र, आता नगर परिषदेच्या स्थापनेमुळे अनुदानात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत नगर परिषदांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो.
सध्या ग्रामपंचायतीत मोजकाच कर्मचारी वर्ग आहे. नगर परिषदेमुळे आता या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग लाभणार असून, त्यांचे पगार हे राज्य सरकारकडून होतील.
नगर परिषदेत पाणीपुरवठा, बांधकाम आणि नियोजन, अशा तीन विभागांसाठी तीन अभियंतेही असणार आहेत.
विकास आराखडा बनेल
सातारा आणि देवळाई गावांच्या हद्दीत सध्या वेगाने बांधकामे होत आहेत; पण या भागासाठी अद्याप विकास आराखडा अस्तित्वात आलेला नाही. मध्यंतरी सरकारने सातारा- देवळाईसह २८ गावांच्या विकास आराखड्याचे काम सिडकोला दिले होते. सिडकोने हा आराखडा तयार केला असला तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही. नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर पहिल्यांदा नगर परिषद हद्दीचा विकास आराखडा तयार होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ब’ वर्गाची नगर परिषद असेल
सातारा-देवळाई ही ‘ब’ वर्ग प्रकारातील नगर परिषद असणार आहे. सातारा देवळाई संयुक्त नगर परिषदेची लोकसंख्या ५१ हजार इतकी आहे. जिल्ह्यातील ६ नगर परिषदांपैकी केवळ सिल्लोड ही ‘ब’ वर्ग नगर परिषद आहे. उर्वरित पाचही नगर परिषदा या ‘क’ वर्गातील आहेत. सातारा-देवळाई नगर परिषदेमुळे जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या ७ झाली आहे.
औरंगाबाद : नगर परिषद स्थापनेच्या निर्णयाची माहिती मिळताच सातारा आणि देवळाई परिसरात आनंदोत्सव साजरा झाला. नागरिकांनी ठिकठिकाणी एकत्र येऊन फटाके वाजविले. सातारा गावात ढोल-ताशांसह मिरवणूकही काढण्यात आली.
४सातारा आणि देवळाई भागात सायंकाळीच संयुक्त नगर परिषद स्थापनेची माहिती येऊन धडकली. त्यानंतर या भागात एकच जल्लोष झाला. सातारा गावात मुख्तार पटेल यांनी जोरदार मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. यामध्ये गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
नगर परिषदेमुळे सातारा आणि देवळाईचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. सातारा-देवळाई भागात पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आता नक्कीच सुटेल. नगर परिषदेसाठी सतत पाठपुरावा केला. त्याला आज यश मिळाले. त्यामुळे शासनाचे आभार.
फेरोज पटेल, माजी सरपंच, सातारा
सातारा- देवळाई नगर परिषद एकत्र व्हावी म्हणून मुंबई मंत्रालयात खेट्या मारल्या. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, आ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड आदींच्या प्रयत्नांमुळे ग्रामविकास व नगरविकास मंत्रालय आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सकारात्मक भूमिकेने जनतेला न्याय मिळाला. -सरपंच करीम पटेल, देवळाई

Web Title: Planned development due to Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.