‘फिनाॅमिनल’विरुद्ध जनहित याचिका; ईडी, सीबीआयकडून चौकशीची गुंतवणूकदारांची विनंती
By प्रभुदास पाटोळे | Updated: August 3, 2023 15:24 IST2023-08-03T15:21:48+5:302023-08-03T15:24:15+5:30
फिनाॅमिनल कंपनीविरोधात देशभरात फसवणुकीचे १३४ गुन्हे दाखल

‘फिनाॅमिनल’विरुद्ध जनहित याचिका; ईडी, सीबीआयकडून चौकशीची गुंतवणूकदारांची विनंती
छत्रपती संभाजीनगर : फिनाॅमिनल हेल्थ केअर व फिनाॅमिनल इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी गुंतवणुकीच्या दुप्पट रकमेचा परतावा आणि रुग्णालयात उपचाराचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबाबत दाखल जनहित याचिका फौजदारी जनहित याचिकेत रूपांतरित करण्याचे आदेश खंडपीठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.वाय.जी. खोब्रागडे यांनी बुधवारी दिले.
फिनाॅमिनल कंपनीची देशभरातील मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना रक्कम द्यावी. तसेच, या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अथवा ‘ईडी’ मार्फत चौकशी करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. लातूर येथील फिनाॅमिनल गुंतवणूक बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा भिंगे, मराठवाडा भोई समाजसेवा संघाच्या वतीने अध्यक्ष शिवराज बारस्कर व इतरांनी ॲड.आर.डी. बिराजदार यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
याचिकेनुसार फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनी व फिनाॅमिनल इंडियाचे अध्यक्ष केशरसिंग मूळचे नेपाळचे आहेत. त्यांनी व त्यांच्या संचालक मंडळाने ७ हजार ते दीड लाख रुपयाची गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवले. तसेच लातूरमध्ये भानुमती हाॅस्पिटल उभारून उच्च दर्जाचे उपचार देण्याचे आमिष दाखवले. त्यातून लातूरमधून ४० ते ५० हजार जणांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. कंपनीने असेच जाळे देशभरातही पसरवले. नंतर कंपनी बंद पडली. मात्र, सभासदांची रक्कम घेऊन संचालक मंडळ पसार झाले.
याबाबत नंदलाल केशरसिंग यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी एक याचिका निवृत्ती खलांग्रे यांनी दाखल केली. त्यानंतर १३ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा १५ जणांविरुद्ध दाखल झाला. एक गुन्हा उस्मानाबादेतही दाखल झाला. देशभरात एकूण १३४ गुन्हे दाखल असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दरम्यान, कंपनीची लातूर, मुरबाड, ठाणेसह देशभरात विविध ठिकाणी मालमत्ता असून त्याची लिलावाद्वारे विक्री करून सभासदांना त्यांची रक्कम अदा करावी. तसेच, कंपनीच्या गैरव्यवहाराची सीबीआय, ईडी मार्फत चौकशी करावी, अशी विनंतीही करण्यात आली.