नातेवाइकाने हातात सलाईन धरलेले घाटी रुग्णालयातील फोटो पुन्हा व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 19:01 IST2021-03-19T19:00:12+5:302021-03-19T19:01:03+5:30
घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १५ मध्ये एका रुग्णाला लावलेली सलाईनची बाटली एक युवती हातात धरून उभी असल्याचा आणि रुग्णालयाच्या पोर्चमध्ये बसलेल्या एका रुग्णाची सलाईनची बाटली हातात धरलेल्या महिलेचा फोटो गुरुवारी व्हायरल झाला.

नातेवाइकाने हातात सलाईन धरलेले घाटी रुग्णालयातील फोटो पुन्हा व्हायरल
औरंगाबाद : हातात सलाईन घेऊन उभ्या राहिलेल्या घाटीतील लहान मुलीचा फोटो मे २०१८ मध्ये समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले होते. तीन वर्षांनंतर गुरुवारी घाटीतील असेच हातात सलाईन धरलेले काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. याविषयीदेखील तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पण बाजूचा सलाईन स्टँड आणेपर्यंतच नातेवाइकाने सलाईन हातात धरल्याचे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले.
घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १५ मध्ये एका रुग्णाला लावलेली सलाईनची बाटली एक युवती हातात धरून उभी असल्याचा आणि रुग्णालयाच्या पोर्चमध्ये बसलेल्या एका रुग्णाची सलाईनची बाटली हातात धरलेल्या महिलेचा फोटो गुरुवारी व्हायरल झाला. ‘घाटीत औरंगाबादसह मराठवाड्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र घाटी रुग्णालयात सुविधांचा वणवा पाहायला मिळतोय’असा मजकूरही त्यासोबत व्हायरल झाला. हा प्रकार घाटी प्रशासनाचा निदर्शनास आला. याप्रकरणी तत्काळ वॉर्ड क्रमांक १५ मध्ये चौकशी करण्यात आली. तेव्हा सलाईन स्डँड आणेपर्यंतच नातेवाइकाने सलाईन हातात धरली होती. या वाॅर्डात १० स्टँड उपलब्ध आहे. तरीही याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.
आधी स्टँड, मग सलाईन लावावी
वरिष्ठ आरोग्य कर्मचारी असेल तर आधी स्टँडवर सलाईन बाटली लटकवली जाते, त्यानंतरच रुग्णाला सलाईन लावली जाते. परंतु ज्युनिअर कर्मचारी असेल तर कधी-कधी असा प्रकार होतो. परंतु काही मिनिटांसाठीच नातेवाईक हातात सलाईन धरून असतात, असेही घाटीने स्पष्ट केले.