‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा; विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:34 IST2025-07-08T19:34:05+5:302025-07-08T19:34:17+5:30
आता जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत.

‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा; विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा!
छत्रपती संभाजीनगर : शेवटच्या दिवशी पोर्टल हँग झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३५०० विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करता आल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान, समाजकल्याण आयुक्तालयाने नुकताच या विद्यार्थ्यांना जिल्हा कार्यालयात जाऊन ऑफलाइन त्रुटींची पूर्तता करता करा, असा दिलासा दिला आहे.
‘स्वाधार’ शिष्यवृत्तीच्या अर्जातील त्रुटी दूर करण्याची १० जून ही शेवटची तारीख होती. त्या दिवसी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचे विद्यार्थी ऑनलाइन त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करीत असताना पोर्टल हँग झाले. परिणामी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करता आल्या नाहीत. यावर ‘लोकमत’ने १८ जूनच्या अंकात ‘साडेतीन हजार विद्यार्थी स्वाधारपासून वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. समाजकल्याण विभागाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अंमलात आणली.
जिल्ह्यातील ९ हजार विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी समाजकल्याण आयुक्तालय स्तरावरून ३५०० विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले, तर १००० विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरले. उर्वरित ४५०० अर्जांत त्रुटी निघाल्यामुळे ते संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर परत पाठविण्यात (सेंडबॅक) आले. प्रत्यक्षात ही कार्यवाही फेब्रुवारी- मार्चमध्ये राबविण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेजदेखील पाठविण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अर्जातील त्रुटी दूर करण्याच्या शेवटच्या दिवशीदेखील १० जून रोजी जिल्ह्यातील ४५०० पैकी १००० हजार विद्यार्थ्यांनी त्रुटी दूर केल्या. उर्वरित ३५०० विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करता आल्या नाहीत. मात्र, आता जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत.
त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी परिवर्तनवादी चळवळ या संघटनेने आंदोलन केले होते. अखेर समाजकल्याण विभागाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल या संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी तत्काळ जिल्हा कार्यालयात जाऊन अर्जातील त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राहुल मकासरे, आदित्य रगडे, सुमित पवार, कमलेश दाभाडे, सुमेध खंडागळे, पवन चव्हाण, सौरभ नरवडे, तथागत ढवळे, शंतनू राठोड आदींनी केले आहे.