परवानगी २१०० ब्रासची, उत्खनन तब्बल १३ हजार ब्रास; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:50 IST2025-08-07T14:49:42+5:302025-08-07T14:50:16+5:30
परवानगीपेक्षा पाचपट जास्त उत्खनन होत असताना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे.

परवानगी २१०० ब्रासची, उत्खनन तब्बल १३ हजार ब्रास; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
छत्रपती संभाजीनगर : रस्ते कामासाठी लागणाऱ्या खडीसाठी अंजनडोह येथील गणपत शेजूळ यांच्या गट क्रमांक ११८ मधील ०.८० आर शेतजमिनीतून २१०० ब्रास दगड उत्खननाची परवानगी जीएनआय या कंत्राटदाराला दिली. परंतु, कंपनीने १३ हजार ब्रास उत्खनन केल्याचे तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आले आहे.
परवानगीपेक्षा पाचपट जास्त उत्खनन होत असताना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. गंगापूर तालुक्यातील सनव येथील वाळूठेक्यामध्ये परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यामुळे एमजेपीला ५६ कोटींचा दंड आकारण्यासह पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार समोर आला आहे. चौका-लाडसावंगी व भाकरवाडी-लाडसावंगी-करमाड येथील रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी खडी लागणार असल्याने कंत्राटदाराने अंजनडोह येथील शेतकरी शेजूळ यांच्या शेतातून दगड उत्खननाची परवानगी जिल्हा प्रशासनाकडे मागितली. शेजूळ आणि कंत्राटदार संस्थेमध्ये उत्खनन करण्याबाबत मुद्रांकावर लेखी करार झाला. त्यानुसार कंत्राटदाराने फेब्रुवारी २०२५ मध्ये १२ लाख ७८ हजार रुपये रॉयल्टीचा भरणा केला. दरम्यान, उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून तहसीलदारांनी पाहणीचा अहवाल ३० जुलै रोजी जिल्हा गौण खनिज विभागाला सादर केला. या अहवालात १३ हजार ब्रास उत्खनन केल्याचे आणि क्रशरवर ३ हजार ब्रास मटेरिअल असल्याचे नमूद आहे. जमीनमालक शेतकरी शेजूळ यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
कारवाईची नोटीस देणार
२१०० ब्रास उत्खननाची परवानगी होती. जास्तीचे उत्खनन केल्याचे अहवालावरून दिसत असून, कारवाईची नोटीस देण्यात येईल.
- अनिल घनसावंत, प्रभारी जिल्हा गौण खनिज अधिकारी