पक्ष बदलणाऱ्यांचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखते

By Admin | Updated: September 20, 2014 00:04 IST2014-09-19T23:53:25+5:302014-09-20T00:04:59+5:30

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे.

The people recognize the 'craft' of party changers | पक्ष बदलणाऱ्यांचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखते

पक्ष बदलणाऱ्यांचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखते

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे. अशा दलबदलूंचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखून आहे, अशी उपरोधिक टीका करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखून द्या, असे आवाहन केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ओम गार्डन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. खा. चव्हाण म्हणाले, जनतेत पत असेल तर मते पडतात. ज्यांची पतच नाही त्यांना मत कसे पडेल. अशांना जनतेनेच बाजूला केले. त्याला अशोकराव चव्हाण जबाबदार नाहीत. जे पक्ष सोडून गेले ते बरे झाले. नव्यांना संधी मिळेल. जे चांगले काम करतील ते पुढे येतील. ५० वर्षे मेहनत घेवून तयार केलेले घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. मतांची विभागणी करण्याची खेळी भाजपा-शिवसेनेकडून होत आहे. त्यातूनच वेगवेगळ्या पक्षाचे लोक उभे केले जातील. तोच उद्योग मला पराभूत करण्यासाठी केला होता. परंतु नांदेडच्या जनतेने विकासाच्या बाजुने कौल दिला.
विधानसभा २००९ च्या विजयाची पुनरावृत्ती करा. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा राज्यात फडकला पाहिजे. त्याची सुरवात नांदेडमधून करा, असे आवाहन करीत खा. चव्हाण म्हणाले, अच्छे दिन कोणाचे आले, जनतेचे नव्हे त्यांचे आले. भाजपाकडून राजकीय दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याच पक्षातील लोकांवर बंधने लादली जात आहेत. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर किती गुन्हे दाखल आहेत हे आधी जनतेला सांगा, नंतर आमच्यावर आरोप करा.
धर्मा-धर्मात, जाती-जातीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्ती करीत आहेत. शिर्डीचे साईबाबा देव नाहीत, असा ठराव विहिंपच्या धर्मसभेत ठराव घेण्यात आला. यातून हिंदू-हिंदुमध्ये भांडणे लावून देण्याचा उद्योग आहे. परंतु जनता हे उद्योग ओळखते. त्यांना महाराष्ट्रात योग्य धडा मिळेल आणि त्याची सुरूवात नांदेडमध्ये होईल, असा विश्वासही माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी व्यक्त केला.
एका विचाराने चाललो म्हणूनच विकासाची कामे दिसत आहेत. येणारा काळ सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा यांचीही भाषणे झाली. मंचावर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, मोतीराम पाटील, सभापती भुक्तरे, नगरसेवक विनय गिरडे पाटील, नवल पोकर्णा, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, मंगलताई निमकर, सुषमा गहेरवार, शमीम बेगम, विजय येवनकर, व्यंकट मुदिराज , संगीता पाटील डक, प्रफुल्ल सावंत आदींसह जि. प., पं. स. सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The people recognize the 'craft' of party changers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.