अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रवासात खड्ड्यांमुळे गाडीसह व्यक्तींचा होतोय खुळखुळा
By राम शिनगारे | Updated: October 29, 2025 19:44 IST2025-10-29T19:43:33+5:302025-10-29T19:44:48+5:30
ऑन द स्पॉट रिपोर्टिंग: ८ ते १० तासांचा लागतो अवधी : खड्ड्यांमुळे चारचाकी गाड्या चालविणे बनले कठीण

अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रवासात खड्ड्यांमुळे गाडीसह व्यक्तींचा होतोय खुळखुळा
छत्रपती संभाजीनगर : शहारातून अहिल्यानगरमार्गे पुण्याला जात किंवा येत असाल, तर प्रचंड मनस्तापासह गाडी आणि व्यक्तींचा खुळखुळा होत आहे. रस्त्यावरील महाभयंकर खड्ड्यांतून वाट शोधता-शोधता केव्हा गाडी खड्ड्यांत आदळते समजतच नाही. काही ठिकाणी तर ग्राऊंड क्लिअरन्स कमी असलेल्या गाड्या सहजपणे रस्त्याला टेकतात. गाडीचे क्लच, ब्रेक सतत दाबत, कमी करीत गिअरवरचा हात काही बाजूला करताच येत नाही. सतत गाडी आदळत राहते. गाडीची स्पिड २० ते ३० च्या दरम्यानच ठेवावी लागते. काही चालक वाहनांची काळजी न घेताच खड्ड्यांतूनच वाहने वेगात चालविण्याचा प्रयत्न करतात. त्याचा त्रास इतर वाहनचालकांना होतो.
वेग कमी आणि गाड्यांची संख्या जास्त असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी ३ ते ४ किलोमीटरच्या रांगाही लागलेल्या दिसून आल्या. रांगा लागलेल्या असताना तिथे एकही वाहतूक पोलिस नसतो. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या २३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जाताना तब्बल १० तासांपर्यंत, तर येताना ८ तासांचा कालावधी लागला. त्यामुळे अनेक प्रवासी केंद्र, राज्य शासनासह यंत्रणेला शिव्यांची लाखोली वाहताना दिसून येतात.
सकाळी साडेसहाला निघाले...
पुण्याला जाण्यासाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी शहारातील विटखेडा परिसरातून चारचाकीने रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता निघाले. नेवासा फाट्यापर्यंत काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे होते. त्यामुळे गाडीला बऱ्या प्रमाणात वेग होता. त्यापुढे नगरपर्यंत प्रचंड खड्डेच खड्डेच दिसून आले. त्यातून गाडी चालविणे अतिशय जीवघेणे होते. खड्डे चुकविणे महाकठीण काम होते. अनेक खड्ड्यांत गाडी घालूनच वर काढावी लागत होती. त्यात गाडी सरळ न चालवता वाकडी-तिकडी घ्यावी लागत होती. हे करताना प्रत्येक वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत होती. अहिल्यानगरला पोहचल्यानंतर बहुतांश वाहचालक ३० किलोमीटरपेक्षा अधिक दूर पडणाऱ्या दौंडमार्गाने पुण्याला जाण्यास प्राधान्य देत होते. दौंडपर्यंत तर संपूर्ण रस्ता सिंमेटचा आहे. मात्र, हा दोन लेनचा रस्ता आणि त्यावर संपूर्ण पुण्याकडील वाहनांची गर्दी वाढल्यामुळे अरणगाव, कोळगाव, काष्टीसह अनेक गावांमध्ये चौकांमध्ये ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. त्या गावांमध्ये ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस उपस्थितीत नव्हते. हीच अवस्था दौंड परिसरात रेल्वे फाटकाजवळ होती. रेल्वेसाठी वाहतूक थांबवली. मात्र, तोपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूंनी ४ किलोमीटरपेक्षा अधिक होत्या. त्यापुढे सोलापूर-पुणे महामार्गाला लागल्यानंतर वखारी, उरुळी कांचन, लोणी काळभाेर या पुण्याबाहेरच्या ठिकाणावर ट्रॅफीकचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढे स्वारगेटला पोहचण्यासाठी सायंकाळचे साडेचार वाजले होते. तब्बल १० तासांहून अधिकचा कालावधी लागला.
पुण्याहून निघाले रात्री ९ वाजता छ. संभाजीनगरात पोहचले पहाटे पाच वाजता
‘लोकमत’चे प्रतिनिधी रात्री ९ वाजेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून छत्रपती संभाजीनगरला निघाले. दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या असल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या लेनवर वाहनांची तुफान गर्दी होती. मात्र, छ. संभाजीनगरकडे येणाऱ्या लेनवर त्या तुलनेत वाहनांची संख्या कमी होती. वाघोली, लोणीकंद, भिमा कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर, शिरूर या ठिकाणच्या जोडरस्त्यांवरील सिग्नलवर ट्रॅफिक जाम असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही धिम्यागतीने वाहने पुढे सरकत होती. या रस्त्यावर तुलनेने वाहनांची संख्या कमी आणि खड्डे नसल्यामुळे सुपेपर्यंत सदरील प्रतिनिधी १२ वाजेपर्यंत पोहचले. तेथून आहिल्यानगरपर्यंत काही मोठमोठे खड्डे बुजविलेले असल्यामुळे वाहनांची गर्दी नसतानाही वेगात वाहने जात होती. अहिल्यानगरच्या जवळ आल्यानंतर पुन्हा खड्डे सुरू झाले. अहिल्यानगरच्या घाटात तर खड्ड्यांनी कहरच केलेला आहे. दिवसा हे खड्डे दिसत होते. रात्री लाइटच्या उजेडात खड्ड्यांचा अंदाजच येत नव्हता. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि धिम्यागतीने वाहन घ्यावे लागले. त्यामुळे सुपेपासून छत्रपती संभाजीनगरला पोहचण्यासाठी तब्बल ५ तासांचा कालावधी लागला. एकूण रात्री ९ वाजेच्या सुमारास निघालेली चारचाकी पहाटे ५ वाजता आठ तासांनंतर शहरात पोहचली.
प्रवासामुळे आजारी
पुण्यात रविवारी नातेवाइकांचा कार्यक्रम होता. जाण्यासाठी १० तास आणि परत येताना आठ तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. या प्रवासामुळे आजारीच पडले आहे. एवढा खराब रस्ता आणि त्रासदायक प्रवास आतापर्यंत कधीही पाहिला नव्हता.
-ज्योती जाधव, प्रवासी