घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण, नातेवाईकांना मोफत जेवण

By Admin | Updated: May 12, 2014 00:40 IST2014-05-12T00:20:52+5:302014-05-12T00:40:03+5:30

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येतात.

Patients in the Valley, Cancer Hospital, Free Meals for Relatives | घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण, नातेवाईकांना मोफत जेवण

घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण, नातेवाईकांना मोफत जेवण

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येतात. एका रुग्णासोबत किमान दोन ते तीन नातेवाईक असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची बरीच हेळसांड होते. मागील दोन वर्षांपासून दररोज दोन वेळचे तीनशे ते चारशे रुग्णांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम आॅल इंडिया मजलीस तामीर-ए-मिल्लततर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमास सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही हातभार लावावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यांतून अनेक रुग्ण येतात. रुग्ण बरा होईपर्यंत नातेवाईकांनाही सोबत राहावे लागते. ज्यांचे नातेवाईक औरंगाबादेत राहतात, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. ज्यांचे शहरात कोणीच नाही, त्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांकडे हॉटेलमध्ये जेवण करण्याएवढे पैसेही नसतात. कोणासमोर हात पसरणेही त्यांना योग्य वाटत नाही. त्यापेक्षा चहा, बिस्किटांवर अनेक जण दिवस काढत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन तामीर-ए-मिल्लत या संस्थेच्या तरुणांनी ऐतिहासिक पाणचक्कीजवळ दोन वेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला. मशीद जमील बेग परिसरात दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दुपारी १२ ते १ आणि सायंकाळी ७ ते ८ यावेळेत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण दिल्या जाते. नातेवाईकांनी पोटभर घरच्यासारखे जेवण करावे हा प्रयत्न मिल्लतच्या तरुणाईचा असतो. सकाळी आणि सायंकाळी मिळून सुमारे चारशे नागरिक येथे जेवण करतात. ज्या रुग्णांसोबत महिला नातेवाईक आहेत, त्यांना पार्सलद्वारे जेवण देण्याची पद्धत आहे. मागील दोन वर्षांमध्ये मिल्लतच्या तरुणांनी एक दिवसही या उपक्रमात खंड पडू दिला नाही. दररोज चारशे जणांना पोटभर जेवण देणे सोपे नाही. मोठी कसरत करीत ते नागरिकांना जेवण उपलब्ध करून देतात. रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देताना कोणताही भेदभाव आमच्याकडे नाही. माणुसकीच्या नात्याने हा उपक्रम सुरू असल्याचे या संस्थेचे सचिव अब्दुल मोईद हशर यांनी नमूद केले. दानशूर मंडळींचे सहकार्य गरजू व्यक्तींना पोटभर जेवण देण्याच्या या उपक्रमाचे अनेक जणांनी प्रशंसा केली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही दानशूर मंडळी दाळ, धान्य, तांदूळ, तेल, मसाले, भाजीपाला आणून देतात. शिवाय काही नागरिक आर्थिक मदतही करीत असतात. नागरिकांच्या सहकार्यावरच हा उपक्रम सुरू असल्याचे मिल्लतच्या तरुणांचे म्हणणे आहे.

Web Title: Patients in the Valley, Cancer Hospital, Free Meals for Relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.