हाकललेला रुग्ण उपचारासाठी पुन्हा घाटीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:30 IST2018-05-29T01:29:11+5:302018-05-29T01:30:36+5:30

लहान मुलीने सलाईन बाटली हातात धरल्याच्या प्रकारानंतर बदनामीचे कारण पुढे करून रुग्णालयातून हाकलून दिलेल्या रुग्णास सोमवारी (दि. २८) उपचारासाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

That patient re-admitted for treatment | हाकललेला रुग्ण उपचारासाठी पुन्हा घाटीत दाखल

हाकललेला रुग्ण उपचारासाठी पुन्हा घाटीत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लहान मुलीने सलाईन बाटली हातात धरल्याच्या प्रकारानंतर बदनामीचे कारण पुढे करून रुग्णालयातून हाकलून दिलेल्या रुग्णास सोमवारी (दि. २८) उपचारासाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपूर्ण उपचार पूर्ण होईपर्यंत सदर रुग्णावर वरिष्ठ डॉक्टरांनी देखरेख ठेवावी, सर्व औषधी देण्यात यावी, अशी सूचना प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.
घाटी रुग्णालयात स्टँडअभावी वडिलांसाठी मुलीला हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालयातून हाक लून देण्यात आले होते. अर्धवट उपचार झालेल्या या रुग्णाने २१ मे रोजी ‘लोकमत’ कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली. एकनाथ गवळे (रा. मौजे भडजी, ता. खुलताबाद) असे या रुग्णाचे नाव असून, त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे २२ मे रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. गवळे हे ५ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतर शस्त्रक्रियागृहातून वॉर्डात नेताना हातात सलाईन धरण्याची वेळ त्यांच्या मुलीवर आली. आजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली. या प्रकाराविषयी माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले. हा विषय थेट दिल्लीपर्यंतही गेला. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांनी घाटी प्रशासनाला जाब विचारला. या घटनेनंतर १८ मे रोजी डिस्चार्ज कार्ड न देता हाकलून दिल्याने उपचार अर्धवट राहिल्याचा आरोप एकनाथ गवळे यांनी केला.

Web Title: That patient re-admitted for treatment