प्रशांत बंब सेनेच्या मार्गावर

By Admin | Updated: July 22, 2014 00:36 IST2014-07-22T00:24:30+5:302014-07-22T00:36:57+5:30

सुनील घोडके , खुलताबाद राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष आ. प्रशांत बंब शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

On the path of Prashant Bombay Sena | प्रशांत बंब सेनेच्या मार्गावर

प्रशांत बंब सेनेच्या मार्गावर

सुनील घोडके , खुलताबाद
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष आ. प्रशांत बंब शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून स्वत: बंब यांनीही सत्ता येणाऱ्याच्या बाजूने आपण राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
आ. प्रशांत बंब लोकसभा निवडणुकीत शिवसेना उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांच्या संपर्कात होते, अशीही उघड चर्चा आता होऊ लागली आहे. खा. खैरे हे आ. बंब यांना शिवसेनेत घेण्यास उत्सुक असल्याचे समजते.
त्याचबरोबर आ. प्रशांत बंब यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. बंब यांना प्रवेश दिलाच, तर हा विरोध काही प्रमाणात मावळेल, असेच काही शिवसैनिकांचे मत आहे.
आ. प्रशांत बंब यांच्या सेना प्रवेशासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत सेनेचे तालुकाप्रमुख गणेश आधाने यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्याला उमेदवारी देतील त्याचे काम प्रामाणिकपणे आपण करू.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कारभारी जाधव पाटील म्हणाले, आम्ही ज्येष्ठ सैनिक असून शिवसेना पक्षाचे १९८५ पासून काम करतो. अनेक आंदोलने केली, पक्ष संघटना वाढविली. १५ वर्षे तालुकाप्रमुख म्हणून तालुक्यात काम केले आणि ऐनवेळी बाहेरचा कुणी येऊन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असेल अशा कुणाला उमेदवारी दिली, तर त्याचा प्रचार मी व माझे कार्यकर्ते करणार नाही.
वेरूळ येथील माजी सरपंच तथा सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पा. मिसाळ म्हणाले की, खुलताबाद तालुकाप्रमुख गणेश आधाने यांस तालुकाप्रमुख पदावरून हटविल्याशिवाय कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे.
आ. बंब समर्थक खुलताबाद बाजार समितीचे माजी सभापती कल्याण पा. नलावडे लोकमतशी बोलताना म्हणाले की, बंब नेमकी काय भूमिका घेतात यावरही बरच काही चित्र अवलंबून आहे.
सत्ता येणाऱ्यांच्या बाजूने राहणार- बंब
शिवसेनेच्या प्रवेशाविषयी आ. प्रशांत बंब यांना विचारले असता ते म्हणाले की, तसे मी काही अजून नक्की केले नाही. मी सत्तेमध्ये राहू इच्छितो. माझ्या मनामध्ये सध्या ज्याची सत्ता येणार आहे, त्याविषयी पक्का विचार सुरू असून सध्या तुम्हाला पक्ष वगैरे काही सांगत नाही. याबाबत लवकरच तुम्हाला सांगणार आहे.
आ. बंब समर्थक खुलताबाद पंचायत समितीचे उपसभापती दिनेश अंभोरे म्हणाले की, बंब यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना प्रवेशाविषयी प्रमुख समर्थक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रवेशाला सहमती दर्शविली असून शिवसेना प्रवेशाचा निर्णय लवकरच होईल.

Web Title: On the path of Prashant Bombay Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.