समुपदेशनानंतर पालक झाले तयार; पोलिसांनी घरातून पळालेल्या प्रेमी युगूलांची बांधली रेशीमगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:29 IST2021-04-08T19:28:41+5:302021-04-08T19:29:53+5:30
पोलीस तपासात समजले की मुलीचे पळशी येथील रमेश ( नाव बदलले आहे ) याच्यावर प्रेम आहे. दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळाले आहेत.

समुपदेशनानंतर पालक झाले तयार; पोलिसांनी घरातून पळालेल्या प्रेमी युगूलांची बांधली रेशीमगाठ
करमाड : पळशी येथील सुशिक्षित व सज्ञान तरुण-तरुणीस विवाहकरून एकत्र राहण्याची इच्छा होती. परंतु, एकाच जातीचे असूनही दोघांच्या घरातून लग्नाला विरोध होऊ शकतो. या कल्पनेतून दोघांनीही घरातून पळून जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघेही मंगळवारी घरातून पळून गेले. या प्रकरण पोलिसात जाताच तपास करत असताना करमाड पोलिसांना खरी माहिती कळाली. यातून पोलिसांनी मध्यस्थ होऊन पालकांचे समुपदेशन करत या जोडप्याचा बुधवारी सायंकाळी विवाह लावून दिला.
करमाड पोलीस ठाण्यात मंगळवारी मुलीची मिसींग दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी मुलीचा शोध सुरु केला. तपासात समजले की मुलीचे पळशी येथील रमेश ( नाव बदलले आहे ) याच्यावर प्रेम आहे. दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळाले आहेत. यानंतर माहिती घेऊन पोलिसांनी मुलाच्या भाऊजीला संपर्क केला. चौकशी केली असता दोघेही सोबत असल्याचे त्यांनी मान्य केले.
यानंतर तपास अधिकारी पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगत तिला रमेशसोबत विवाह करायचा असल्याची माहिती दिली. मात्र, मुलीचे आई - वडिल व इतर नातेवाईकांनी विरोध दर्शविला.
पोलिसांच्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांनी विवाहाला मान्यता दिली. बुधवारी संध्याकाळी पळशी येथे मुलाच्या भाऊजीच्या घरी पोलीसांचे मध्यस्थीने अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह पार पडला. या शुभकार्यासाठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस , पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले. विवाहानंतर दोन्ही कुटूंबानी पोलीसांचे आभार व्यक्त केले. औरंगाबाद ग्रामीण अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबत पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस , पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांचे अभिनंदनकरून बक्षीस जाहीर केले.