परशुरामांचा जयजयकार, ढोलताशांचा दणदणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:35 IST2019-05-07T23:35:23+5:302019-05-07T23:35:36+5:30
‘भगवान परशुराम की जयजयकार’ असा गगनभेदी जयघोष आणि तेवढाच जोश, उत्साहात तरुणाईने केलेल्या ढोलताशांच्या दणदणाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांनी विविध धार्मिक गीतांवर नृत्य करीत आनंदोत्सव उंचीवर नेऊन ठेवला. या शोभायात्रेद्वारे शिस्तीचे दर्शन ब्राह्मण समाजाने घडविले.

परशुरामांचा जयजयकार, ढोलताशांचा दणदणाट
औरंगाबाद : ‘भगवान परशुराम की जयजयकार’ असा गगनभेदी जयघोष आणि तेवढाच जोश, उत्साहात तरुणाईने केलेल्या ढोलताशांच्या दणदणाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांनी विविध धार्मिक गीतांवर नृत्य करीत आनंदोत्सव उंचीवर नेऊन ठेवला. या शोभायात्रेद्वारे शिस्तीचे दर्शन ब्राह्मण समाजाने घडविले.
ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी (दि.७) सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथून निघालेल्या या शोभायात्रेत भगवान परशुरामाची पालखी, देखावे, महिलांचे लेझीम पथक, विविध जम्बो ढोलपथकांचे जल्लोषपूर्ण वादन यामुळे संपूर्ण वातावरण भारावून निघाले होते. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या वतीने कलश डोक्यावर घेऊन महिला अग्रभागी चालत होत्या. काही महिला धार्मिक गीतांवर गरबा खेळत होत्या. भगवान परशुरामाची प्रतिमा असलेली पालखी खांद्यावर घेऊन जनार्दन अवस्थी व सुरेंद्र दुबे चालत होते. पाठीमागील बाजूस ब्राह्मण महिला मंचातील महिला व तरुणी लेझीम खेळण्यात दंग झाल्या होत्या. भार्गव केसरी ढोलपथकातील तरुण-तरुणी जोशपूर्ण पण तेवढ्याच शिस्तीत ढोल वादन करीत होते. शहागंजातील गांधी पुतळा परिसरात बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. नाद गंधर्व ढोलपथकात जांभळ्या रंगाचा नेहरू शर्ट, पायजमा परिधान केलेले युवक-युवती जोरदार ढोलताशा वादनाचे सादरीकरण करीत होते. राजस्थानी विप्र समाजाच्या वतीने ब्राह्मण एकतेचा रथ आणण्यात आला होता. या रथात उभारण्यात आलेली भगवान परशुरामांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेचा चित्ररथ ‘समाजात जन्माला आलेले साधू-संत ज्यांनी जातिभेद निर्मूलनाचे कार्य केले’ अशा साधू-संतांचे छायाचित्र व संदेश देण्यात येत होते. नऊवार साडी नेसलेल्या व हातात टाळ घेऊन महिला ‘यह है भगवा रंग’ या गाण्यावर पावली खेळण्यात हरखून गेल्या होत्या. ब्रह्मास्त्र ढोल पथकातील तरुणाईने शिस्तीत ढोल वादन करत सर्वांना खिळवून ठेवले होते. शोभायात्रा बघण्यासाठी चोहोबाजूने गर्दी जमली होती. यामुळे ढोलवादन करणाऱ्यांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला होता. सराफा रोड, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडीमार्गे शोभायात्रा औरंगपुºयातील भगवान परशुराम चौकात पोहोचली. शोभायात्रा यशस्वीतेसाठी समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, प्रकल्पप्रमुख धनंजय पांडे, मिलिंद दामोदरे, सुरेश देशपांडे, राजेंद्र शर्मा, आनंद तांदुळवाडीकर, अनिल मुळे, अनिल खंडाळकर
संजय मांडे, अरविंद पाठक, धनंजय कुलकर्णी, विनोद मांडे, माणिक रत्नपारखी, अभिषेक कादी, अमित पुजारी, विजया अवस्थी, गीता आचार्य, विजया कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
ढोलपथकाचा ‘ब्रह्मनाद’
शोभायात्रेत लक्षवेधी ठरले ते ‘ब्रह्मनाद’ ढोलपथक. ७० तरुणी व १३० तरुणांच्या ढोलताशा पथकाने संपूर्ण शोभायात्रा मार्ग दणाणून सोडला होता. चार तरुणींनी शंखनाद केल्यानंतर ढोलवादनाला सुरुवात केली जात होती. ढोलताशांच्या गजरात भव्य भगवा ध्वज फिरविला जात होता. त्यातून सर्वांवर पुष्पवृष्टी केली जात होती. अधूनमधून इको-फ्रेंडली फटाक्यातून रंगीबेरंगी कागदी तुकड्यांचा वर्षाव होत होता. या ढोलपथकाने दणदणाट केला; पण शिस्तीचेही दर्शन घडविले.
चौकट
शोभायात्रेत भारतरत्नांचा गौरव
जिल्हा काण्व ब्राह्मण समाजाने देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्नप्राप्त ४८ महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारा सजीव देखावा तयार केला होता. लहान मुलींकडे एका भारतरत्नाचे छायाचित्र होते. ज्यांनी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन देशाच्या विकासासाठी कार्य केले, अशा सर्व भारतरत्नांच्या कार्याची महती सांगितली जात होती.