श्रीराम नामाने दुमदुमली परभणी
By Admin | Updated: April 16, 2016 01:41 IST2016-04-16T01:34:51+5:302016-04-16T01:41:41+5:30
परभणी : श्रीराम नवमीनिमित्त परभणी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जय श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. सजीव देखाव्यांसह लेझीम

श्रीराम नामाने दुमदुमली परभणी
परभणी : श्रीराम नवमीनिमित्त परभणी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जय श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. सजीव देखाव्यांसह लेझीम पथकाने परभणीकरांचे लक्ष वेधले होते. उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत परभणीकरांचाही मोठा सहभाग होता.
श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात महंत रघुनाथदास बाबाजी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. यावेळी खा. बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, नगरसेवक डॉ.विवेक नावंदर, अजय गव्हाणे, मकरंद महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ही शोभायात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, अष्टभूजा देवी मंदिर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे शनिवार बाजार मैदानापर्यंत काढण्यात आली. शनिवार बाजार येथील मैदानात शोभायात्रेचा समारोप १ हजार जोडप्यांच्या हस्ते महाआरती करुन करण्यात आला.
शोभायात्रा पाहण्यासाठी परभणी शहरातील नागरिक, महिला व युवकांची मोठी गर्दी झाली होती. शोभायात्रा काढण्यात आलेल्या मार्गावर जागोजागी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत भाविकांच्या वतीने करण्यात आले. (प्रतिनिधी)
श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. प्रथम पाच महिलांनी बुलेट चालवून सुरुवात केली. यानंतर दोन तुतारीवादक, वासुदेव, गोंधळी, २०० मुलींचे लेझीम पथक, एक हजार फेटेधारी, झेंडेधारी महिला, हलगी पथक, महाराष्ट्रीयन वेषभूषेतील १०० मुली, वारकरी महिला व पुरुष, सर्व महाराजांच्या ट्रॉलीतील प्रतिमा, पाच आश्व, रथ देखावा, मुलांचे लेझीम पथक, झांज पथक, वानरसेना, प्रभू श्रीरामांची मूर्ती, झेंडेधारी युवक, साऊंड सिस्टिम, सर्व पुरुष व यानंतर रुग्णवाहिकेसह अग्नीशमन दलाची गाडी असा शोभायात्रेतील देखाव्यांचा क्रम ठेवण्यात आला होता. यात सर्वांचे आकर्षण ठरले ते २०० चिमुकल्यांची वानरसेना. या वानरसेनेत प्रत्येक चिमुकल्याच्या हाती गदा, हनुमानाप्रमाणे त्यांची वेशभूषा करण्यात आली होती.