प्रेयसीजवळ येण्यासाठी मास्क काढला अन् कुख्यात गुन्हेगार सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 19:52 IST2022-03-17T19:51:34+5:302022-03-17T19:52:13+5:30
पप्पूच्या फोन कॉलचा अभ्यास करीत, त्याच्या प्रेयसीचेही लोकेशन घेत पोलिसांचे पथक पाच दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे पोहोचले.

प्रेयसीजवळ येण्यासाठी मास्क काढला अन् कुख्यात गुन्हेगार सापडला
औरंगाबाद : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली आणि आाकाशवाणीजवळ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणारा कुख्यात गुन्हेगार राजेंद्र भीमा चव्हाण ऊर्फ पप्पू घिसाडी (२८, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. नगर) याला जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने प्रेयसीकडे आल्यानंतर बेड्या ठोकल्या. आकाशवाणीजवळ साथीदाराच्या मदतीने मंगळसूत्र चोरल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात त्याने तोंडावरचा मास्क काढला अन् सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चेहरा टिपला. या एकाच पुराव्यावरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
शहानूरमियाँ दर्गा परिसरात १ फेब्रुवारी आणि अकाशवाणीजवळ १० मार्च रोजी पप्पूने सहकाऱ्यासोबत मंगळसूत्र हिसकावले होते. जवाहरनगरचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक अजित दगडखैर, पोलीस कर्मचारी मनोज अकोले, विजय वानखेडे, मारोती गोर आणि प्रदीप दंडवते यांच्या पथकाने आकाशवाणीपासून शहराबाहेर जाईपर्यंतचे १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांतील रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीमध्ये पप्पूच्या साथीदाराने चेहऱ्यावरील मास्क काढला. त्यावरूनच पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
पप्पूच्या फोन कॉलचा अभ्यास करीत, त्याच्या प्रेयसीचेही लोकेशन घेत पोलिसांचे पथक पाच दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे पोहोचले. पप्पू स्वत:जवळ सतत गावठी कट्टा बाळगतो. त्यामुळे अतिशय सावधगिरीने त्याला पकडणे गरजेचे होते. फौजदार दगडखैर यांनी सतत त्याच्यावर नजर ठेवली. पाचव्या दिवशी तो बेलापूर येथील प्रेयसीच्या घरात गेल्यानंतर पप्पूस पहाटे पकडले. त्याला ताब्यात घेताना त्याच्या प्रेयसीने मोठा गोंधळ घातला होता. मात्र पोलिसांनी शिताफीने परिस्थिती हाताळत त्याला औरंगाबादेत आणले. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
तब्बल १४ गुन्हे दाखल
पप्पूवर खुनासह दरोडा, मंगळसूत्र चोरी, इ. १४ गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार असलेल्या आरोपीवरही २४ गुन्हे दाखल असून, त्यातील १९ गुन्हे हे मंगळसूत्र हिसकावल्याचे आहेत. हे दोन्ही गुन्हेगार सोबत गावठी कट्टा बाळगतात. त्यांनी पोलिसांवरही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना पकडणे हे आव्हानात्मकच होते. श्रीरामपूर परिसरात हे दोघेही गुन्हेगारीसाठी कुख्यात आहेत.