पांगरा तलावालगत अतिक्रमण
By Admin | Updated: June 23, 2014 00:29 IST2014-06-23T00:00:08+5:302014-06-23T00:29:36+5:30
खुलताबाद : खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील पांगरा तलावालगत सय्यद कब्रस्तान कमिटीच्या जागेवर अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करून कार्यालय थाटले आहे.

पांगरा तलावालगत अतिक्रमण
खुलताबाद : खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील पांगरा तलावालगत सय्यद कब्रस्तान कमिटीच्या जागेवर अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करून कार्यालय थाटले आहे.
खुलताबाद येथे पूर्वीपासून पांगरा तलाव असून, तलावाच्या परिसरात सय्यद जमातीच्या लोकांचे परिवारिक कब्रस्तान आहे. सदर जागा सर्व्हे नं. २ मध्ये असून, सातबारामध्ये कब्रस्थान कमिटी खास अशी नोंद आहे. त्याचा फेरफार नं. ८०१ आहे. फुलंब्री रस्त्यावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जागा असल्याने या जागेवर अनेक भूमाफियांच्या नजरा आहेत.
सदरील कब्रस्तानच्या जागेवर अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून कार्यालय थाटले आहे.
मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत अनेकांनी तक्रारी करूनही नगर परिषदेने बांधकाम थांबविले नाही व त्याची साधी दखलही घेतली नाही. बांधकाम करण्याकरिता नगर परिषदेची परवानगी लागते. कुठलीही परवानगी, कागदपत्रे नसताना बांधकाम करण्यात आले. याबाबत नगर परिषदेच्या बांधकाम निरीक्षकांनी न.प. कार्यालयास कळविले नसल्याचे समजते.
सय्यद कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष हाफीज सय्यद युसूफ, सचिव सय्यद मुजफ्फर यांनी या अतिक्रमित कार्यालयाचे बांधकाम न पाडल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे व नगर परिषद मुख्याधिकारी, तहसीलदार यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)
मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या एवढे मोठे अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले असून, नगर परिषद व तहसील प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने सय्यद कब्रस्तान कमिटीने या प्रकरणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.