पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच कायापालट; काश्मीर, दिल्लीतील गार्डनच्या धर्तीवर विकास

By बापू सोळुंके | Published: March 14, 2024 06:26 PM2024-03-14T18:26:14+5:302024-03-14T18:26:56+5:30

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत १४९ कोटींचा निधी मंजूर 

Paithan's Saint Dnyaneshwar Udyan soon to be transformed; Development will be on the lines of Garden in Kashmir, Delhi | पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच कायापालट; काश्मीर, दिल्लीतील गार्डनच्या धर्तीवर विकास

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच कायापालट; काश्मीर, दिल्लीतील गार्डनच्या धर्तीवर विकास

छत्रपती संभाजीनगर : काश्मीरच्या श्रीनगरमधील निशांत गार्डन आणि नवी दिल्लीतील अमृत उद्यानाच्या धर्तीवर पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत १४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

आठ दिवसांत या कामाच्या निविदा प्रक्रिया काढण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या पायथ्याशी ७९ हेक्टरवर संत ज्ञानेश्वर उद्यान वसलेले आहेत. या उद्यानातील रंगीबेरंगी कारंजे आणि आकर्षक उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या उद्यानाला भेटी द्यायचे. मात्र मागील काही वर्षापासून या उद्यानाची देखभाल दुरूस्ती न झाल्याने उद्यानातील साहित्याची मोडतोड झाली. उद्यानातील कारंजे, पथदिवे, बंद पडले, रस्ते उखडले होते. परिणामी भकास झालेल्या उद्यानाकडे पर्यटक फिरकत नव्हते. 

लोकप्रतिनिधींकडूनही शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या उद्यानाचे सुशोभीकरण आणि विकास करण्याचा प्रस्ताव दिला होता. मंत्रिमंडळ बैठकीत निधी देण्याचा निर्णय झाला होता. यानंतर महामंडळाने उद्यानाचे नूतनीकरण करण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये एका एजन्सीची नियुक्ती केली होती. या एजन्सीने श्रीनगरमधील निशांत गार्डन आणि नवी दिल्लीतील अमृत गार्डनचा अभ्यास करून त्याच धर्तीवर दोन टप्प्यांत उद्यानाचे नूतनीकरण करण्याचा अहवाल सादर केला होता. पहिल्या टप्प्यासाठी १४८ कोटी ७८ लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५३ कोटी ६२ लाख रुपये असा एकूण २०२ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. या प्रस्तावावर मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत चर्चा झाली.पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी यासाठी पाठपुरावा केल्याचे गवळी यांनी नमूद केले.

उद्यानात काय असेल नवीन?
-भव्य प्रवेशद्वार
-विठूरायाची आकर्षक मूर्ती
-सेंट्रल गार्डन
- लेझर शो
-संगीतमय कारंजे
- किड्स प्ले एरिया आणि गेम झोन
- ॲक्वा स्केपिंग रोझ गार्डन
-टुरिस्ट हाऊस
-सेंट्रल व्हिस्टा, वॉटर वे, सोबतच लॅण्डस्केप गार्डन
-अद्ययावत अंतर्गत रस्ते
-मिनी ट्रेन
-जांभूळवनाचे सुशोभीकरण
-उद्यानाजवळच बोटिंग सुविधा
-मनोरंजन झोन
-नाथसागर आणि परिसराचा विकास
- भव्य वाहन पार्किंग

Web Title: Paithan's Saint Dnyaneshwar Udyan soon to be transformed; Development will be on the lines of Garden in Kashmir, Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.