MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:47 IST2025-12-21T18:41:46+5:302025-12-21T18:47:25+5:30
अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, पण जनतेने आधीच 'नेते' केलं! पैठणच्या स्नेहलचा झंझावात

MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका
पैठण: "राजकारणात येऊनही समाजसेवा करता येते आणि शहराचा कायापालट करता येतो," हा विश्वास उराशी बाळगून पैठणच्या २२ वर्षांच्या स्नेहल धुपे यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. बी. फार्मचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या या तरुणीने राजकारणात घेतलेली ही उडी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
शिक्षकाच्या लेकीस भावाचं प्रोत्साहन
स्नेहल या एका शिक्षकाची मुलगी आहे. छत्रपती संभाजीनगरातून बी. फार्मचे उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी एमपीएससीची तयारी करत होत्या. मात्र, आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या भावाने खंबीर साथ दिली आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रोत्साहित केले.
स्वच्छ पैठणचा संकल्प
"केवळ तक्रारी करण्यापेक्षा व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी त्यात उतरणे गरजेचे आहे," असे स्नेहल यांचे मत आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी शहर स्वच्छतेस आपले पहिले प्राधान्य असल्याचे जाहीर केले आहे. अभ्यासाच्या शिस्तीमुळे स्नेहल यांनी निवडणुकीच्या काळातही नियोजनबद्ध प्रचार केला आणि मतदारांचे मन जिंकले. त्यामुळे त्यांचा विजय साकार झाला.
बदलासाठी तरुणांनी राजकारणात यावे
वयाच्या ज्या वर्षी अनेक तरुण आपल्या करिअरची दिशा शोधत असतात, त्याच वयात स्नेहल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या यशामुळे पैठणमधील तरुणाईत आनंदाचे वातावरण असून, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.