पैठण शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 21:19 IST2023-02-02T21:17:48+5:302023-02-02T21:19:07+5:30
पैठण शहर व परिसर गुरुवारी दुपारी १.३३ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा गूढ आवाज आला.

पैठण शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये घबराट
पैठण : शहर व परिसर गुरुवारी दुपारी १.३३ वाजेच्या सुमारास गूढ आवाजाने हादरला. या आवाजाची तीव्रता परिसरातील १० ते १५ किलोमीटर परिसरातील परिघात जाणवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पैठण शहर व परिसर गुरुवारी दुपारी १.३३ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा गूढ आवाज आला. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच चलबिचल झाली. जोरदार आवाजामुळे घरातील साहित्य हलले. छताचे पत्रे थरथरले, खिडकीच्या काचांचा आवाज झाला. यावेळी अनेक नागरिक घराबाहेर पडले. यावेळी नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची चर्चाही होती. हा आवाज तालुक्यातील चानकवाडी, तेलवाडी, जुने कावसान, चांगतपुरी, दादेगाव, जहागीर, जायकवाडी आदी गावशिवारासह पैठण शहराच्या १० ते १५ किलोमीटर परिघात जाणवला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. जायकवाडी येथील भूमापक यंत्र गेल्या सात वर्षांपासून बंद असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे याबाबत अधिकृत नोंद झाली नाही.
तीन वर्षानंतर पुन्हा आवाज
पैठण शहरात यापूर्वी २४ फेब्रुवारी, २०२० रोजी गूढ आवाज आला होता. गेल्या सात वर्षात गुरुवारी बसलेला गूढ आवाजाचा हा ३० वा हादरा आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत. यंदा मात्र जानेवारीत हादरा बसला आहे. भूकंप मापन यंत्रच येथे नसल्याने याची अधिकृत नोंद होत नाही. त्यामुळे या आवाजाचे गूढ कायम आहे. याबाबत प्रशासनाकडूनही काहीही खुलासा करण्यात येत नसल्याने जनतेमध्ये संभ्रम कायम आहे.
नव्याने भूमापक यंत्रासाठी निविदा काढणार
गुरुवारी दुपारी पैठण शहरासह परिसरात शक्तिशाली गूढ आवाज झाला. याबाबत जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेस दुजोरा दिला. ते म्हणाले, नाथसागर धरण हे वर्ड बँकेशी कनेक्टेड असल्यामुळे याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील नव्या भूमापक यंत्रासाठी ४५ लाख रुपयांच्या लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. पूर्वी ज्या ठिकाणी हे भूमापक केंद्र बसवण्यात आले होते. तेथेच हे यंत्र बसवण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.