पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:05 IST2025-08-08T15:58:24+5:302025-08-08T16:05:02+5:30
पैठण येथील विणकर मंगल रवींद्र पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्र मार्धेरीटा यांनी गौरव केला.

पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव
- दादासाहेब गलांडे
पैठण: आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने पैठणी विणकामाच्या परंपरेला नवा आयाम देणाऱ्या पैठण येथील विणकर मंगल रवींद्र पगारे यांचा गुरुवारी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्र मार्धेरीटा यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पैठण शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मंगल रवींद्र पगारे यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले असून त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती, परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या पूर्वी शेतात रोजंदारीचे काम करीत असत; पण त्यांनी जिद्दीने पैठणी विणण्याची कला सात वर्षांपूर्वी आत्मसात केली आणि मेहनतीने नवा मार्ग निवडला. आज त्या घरूनच वीस हजार ते एक लाख रुपये किमतीच्या पैठणी तयार करून ग्राहकांना विकतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिल्ली येथे गुरुवारी केंद्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावर पैठणचा पुन्हा गौरव
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जुलै रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पैठण येथील कविता अरुण ढवळे या विणकर महिलेच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले होते. आता मंगल रवींद्र पगारे यांच्या निमित्तानेही पुन्हा एकदा पैठणचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
हक्काची बाजारपेठ द्यावी
माणसाच्या मनात जिद्द असेल तर काहीच अवघड नाही. या निमित्ताने केवळ माझा नव्हे, तर पैठण व महाराष्ट्रातील सर्व विणकर समाजाचा गौरव झाला आहे. शासनाकडून एकच अपेक्षा आहे, पैठणीला हक्काची बाजारपेठ आणि नवीन कारागीर निर्माण करण्यासाठी सरकारने धोरण राबवावे.
-मंगल रवींद्र पगारे, विणकर, पैठण