अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे
By Admin | Updated: August 28, 2016 00:17 IST2016-08-28T00:15:57+5:302016-08-28T00:17:47+5:30
उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत.

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे
उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत. असे असतानाही पालकमंत्र्यांकडे मात्र परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशी कार्यालये सुरू ठेवून उपयोग तरी काय? असा सवाल करीत पालकमंत्री, कृषीमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा आमदार राजणाजगजितसिंह पाटील यांनी दिला.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. पाटील म्हणाले की, जानेवारी २०१६ पासून जिल्हाभरातील सुमारे १०८ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांनी साडेपाचशे कोटींचे पॅकेज जाहीर केले. गतवर्षी यातील केवळ १२ कोटी मिळाले. त्याचाही प्रभावीपणे वापर झाला नाही. यावर्षी पुरवणी मागणीमध्ये केवळ १५ कोटी देण्यात आले. प्रत्येक वर्षी असे दहा-बारा कोटी दिल्यास साडेपाचशे कोटी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी केला. कळंब तालुक्यात आजवर केवळ २६३ मिमी म्हणजेच २९.१६ टक्के पाऊस झाला. वाशी, उस्मानाबाद तालुक्यात ४१ टक्के, आणि परंडा तालुक्यात ३८ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. सातत्याने चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनासह प्रशासनाचीही जबाबदारी वाढली आहे. परंतु, या प्रश्नी ना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत ना संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बैठक घेवून परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे हे दोघेहे जिल्ह्यातील परिस्थितीबाबत गंभिर नसल्याचे स्पष्ट होत असे आ. पाटील म्हणाले.(प्रतिनिधी)