अवैध लिंगभेद चाचणी व विल्हेवाटप्रकरणी आणखी काही डॉक्टर रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:29 IST2019-02-06T23:29:26+5:302019-02-06T23:29:59+5:30
गर्भलिंगभेद चाचणी व परस्पर विल्हेवाट लावण्याचा हा गोरखधंदा शहरातील काही दवाखान्यांत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शहरातील अजून काही डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अवैध लिंगभेद चाचणी व विल्हेवाटप्रकरणी आणखी काही डॉक्टर रडारवर
औरंगाबाद : गर्भलिंगभेद चाचणी व परस्पर विल्हेवाट लावण्याचा हा गोरखधंदा शहरातील काही दवाखान्यांत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शहरातील अजून काही डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईनंतर ९ जणांना अटक करण्यात आली असून, त्यामुळे अवैध काम करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
डॉ. सूरज सूर्यकांत राणा यांच्या उस्मानपुरा येथे घरवजा दवाखान्यावर टाकलेल्या धाडीनंतर ही साखळी पुढे जोडली जात आहे. डॉ. वर्षा राजपूत आणि दोन डॉक्टरांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर शहरात काही डॉक्टरांची अवैध गर्भपात प्रकरणात एक साखळीच असल्याचे समोर येत आहे. कोठडीदरम्यान आरोपींकडून समोर येत असलेल्या माहितीवरून आणखी किती डॉक्टर बेकायदा लिंगभेद चाचणी करण्याच्या प्रकारात गुंतले आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, अवैध गर्भलिंगभेद प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई केली जात आहे, कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नसल्याचे मनपा आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. नीता पाडळकर तसेच तपासिक अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील अनेक भागातील माहिती समोर येत असल्याने आणखी कुठे कुठे अवैध गर्भपाताचा धंदा चालवला जातो यावर तपास पथकाने पाळत ठेवली आहे. आरोपींकडून मिळणाºया माहितीवरून मनपाचे पथक आणि पोलीस कारवाईची तयारी करत आहेत.
चौकट...
काही नावे समोर येत आहेत
यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरोपींकडून शहरातील काही डॉक्टरांची नावे पुढे येत असून, यादृष्टीने कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.