छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:31 IST2025-04-10T16:30:01+5:302025-04-10T16:31:14+5:30

रुग्णालय ते विमानतळापर्यंत पोलिस दलाने ग्रीन कॉरिडोर तयार केले होते.

Organ donation from 37-year-old brain-dead man in Chhatrapati Sambhajinagar, gives new life to 7 people | छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य

छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य

छत्रपती संभाजीनगर : हृदय, यकृत, किडनीनंतर मराठवाड्यात बुधवारी पहिल्यांदाच फुप्फुस दान झाले. एका ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाने ७ जणांना नवे आयुष्य मिळाले. गोकुळदास बाबूराव कोटुळे (रा. वांगी, जि. बीड) असे ब्रेनडेड रुग्णाचे नाव आहे.

शेतीच्या कामासाठी गोकुळदास कोटुळे ७ एप्रिल रोजी जरूड फाटा (जि. बीड) येथे गेले होते. यावेळी अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला. बीड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी डाॅक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. त्याचवेळी कुटुंबीयांना अवयवदानाची माहिती देण्यात आली. गोकुळदास कोटुळे यांच्यामुळे कुणाला तरी जीवदान मिळेल, या भावनेने पत्नी कोमल कोटुळे, वडील बाबूराव कोटुळे आणि भाऊ दत्तू कोटुळे यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. डाॅ. विजय मुंढे, डाॅ. राहुल वहाटुळे, डाॅ. विनोद चावरे, डाॅ. अमोल खांडे, डाॅ. बालाजी बिरादार, डाॅ. वाजिद मोगल, डाॅ. अभिमन्यू माकणे, डाॅ. उमेश काकडे, डाॅ. देवेंद्र लोखंडे, डाॅ. सुजाता चांगुळे, डाॅ. जयेश टकले, डाॅ. सुदर्शन जाधव, डाॅ. अभय महाजन, डाॅ. प्रदीप सरुक, डाॅ. अरुण चिंचोळे यांनी परिश्रम घेतले. ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डाॅ. प्रवीण सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

हृदय, यकृत मुंबईत, फुप्फुस अहमदाबादला
हृदय आणि यकृत विमानाने मुंबईतील रुग्णालयांकडे पाठविण्यात आले, तर फुप्फुस अहमदाबादेतील रुग्णालयासाठी रवाना झाले. एक किडनी आणि दोन्ही नेत्र प्रत्यारोपणासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तर एका किडनीचे गॅलक्सी हाॅस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.

काही मिनिटांत रुग्णवाहिका विमानतळावर
हृदय, यकृत आणि फुफ्फुसासाठी तीन रुग्णवाहिका विमानतळाकडे रवाना झाल्या. त्यासाठी रुग्णालय ते विमानतळापर्यंत पोलिस दलाने ग्रीन कॉरिडोर तयार केले होते. प्रत्येक रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत विमानतळावर पोहोचल्या.

पदवीधर असून शेतीकाम
भाऊ गोकुळदास हा पदवीधर होता. शेतीकाम करीत होता. अचानक अपघात झाला आणि तो ब्रेनडेड झाला. कुणाचा तरी जीव वाचेल, म्हणून आम्ही अवयदान केले.
- दत्तू कोटुळे, भाऊ

Web Title: Organ donation from 37-year-old brain-dead man in Chhatrapati Sambhajinagar, gives new life to 7 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.