साडे सहा लाख वसूल करण्याचे आदेश
By Admin | Updated: January 21, 2015 01:09 IST2015-01-21T01:04:28+5:302015-01-21T01:09:01+5:30
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मौजे देवळाली ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्याच्या कामावरील अतिप्रदानाबाबत संबंधितावर

साडे सहा लाख वसूल करण्याचे आदेश
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मौजे देवळाली ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्याच्या कामावरील अतिप्रदानाबाबत संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधित चार अधिकाऱ्यांकडून सुमारे साडे सहा लाख रुपयांची रक्कम वसुल करण्याचे आदेश दिले आहेत.
कळंब तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माळकरंजा ते माळी वस्ती, देवळाली ते तानाजी माने शेतरस्ता, तानाजी माने शेतरस्ता ते बोरगाव शिवरस्ता व देवळाली ते अंकुश साठे शेतरस्ता या चार रस्त्यांचे काम रोहयोच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र सदर कामात गैरव्यवहार झाल्याच्या तसेच रस्त्याची कामे न करता देयक पारित करून अनियमितता केल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने कामाची चौकशी करण्यात आली. तसेच संयुक्त मोजणी पथकाव्दारे कामाची मोजणी करण्यात आली असता, या कामात अतिप्रदान झाल्याचा ठपका या समितीने ठेवला होता. संयुक्त मोजणी पथकाच्या अहवालानुसार संबंधितावर निलंबन निधी कायम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंगळवारी दिले. यानुसार कळंब पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकारी प्रवीण काळे, जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता सी. आर. राऊळ, शाखा अभियंता टी. पी. हनवते, ग्रामसेवक जी. बी. घुटे यांच्याकडून जादा रकमेचे अतिप्रदान झाल्याचे चौकशीतून पुढे आल्याने या अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी १ लाख ६३ हजार ७५९ रुपये निलंबन निधी वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)