दारुबंदीसाठी चिंचाळा ग्रामस्थ आक्रमक
By Admin | Updated: August 12, 2014 01:55 IST2014-08-12T00:41:30+5:302014-08-12T01:55:45+5:30
बीड: सध्या दारुबंदीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामस्थ आक्रमक होताना दिसून येत आहेत. असाच आक्रमकपणा वडवणी तालुक्यातील चिंचाळ्याच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

दारुबंदीसाठी चिंचाळा ग्रामस्थ आक्रमक
बीड: सध्या दारुबंदीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामस्थ आक्रमक होताना दिसून येत आहेत. असाच आक्रमकपणा वडवणी तालुक्यातील चिंचाळ्याच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी दारुबंदी करा, अन्यथा पोलिसांना सोबत घेऊन धाडी टाकण्यात येतील, असा इशारा सरपंच बळीराज आजबे यांनी दिला आहे.
चिंचाळा येथे मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे. गावामध्ये चार ते पाच दारुची दुकाने आहेत. या दारुने आतापर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. मागील दोन वर्षापूर्वी गावातील तरुणांनी एकत्र येऊन पोलिसांच्या मदतीने दारुबंदी केली होती. त्यानंतर काही दिवस गावात दारू विक्री झाली नाही. मात्र दारू विक्रीस पुन्हा सुरुवात झाली. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर गावातील दारुची दुकाने बंद न झाल्यास ग्रामस्थ एकत्र येऊन पोलीस ठाणे व तहसीलसमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा सरपंच बळीराम आजबे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामसभेत यासंदर्भात ठरावही घेण्यात येणार असल्याचे आजबेंनी सांगितले. यामुळे आता अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत.(वार्ताहर)